दोन वर्षानंतर वणीत रामनवमी शोभायात्रेचा जल्लोष

ढोल ताशांचा गजरात भव्यदिव्य शोभायात्रा, देखाव्यांनी वेधले वणीकरांचे लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा रामनवमीची शोभायात्रा जल्लोषात शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली. ढोल ताशा, भजनी मंडळाचा गजर यात हर्षोल्हासात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शोभायात्रेतील नयनरम्य देखावे व भव्यदिव्य निघालेली शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

रामनवमीमुळे संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगवी पताका लावून शहर सुशोभीत करण्यात आले होते. अनेक ठिकाणी लायटिंगही लावण्यात आली होती. जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे विधिवत पूजन करून संध्याकाळी 6 वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षण पालखी, घोडे, रथ, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यासह विशेष आकर्षण म्हणजे नेत्रदीपक रांगोळी होती. पुणे येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार भुषण खंडारे हे शोभायात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात नेत्रदीपक अशी रांगोळी काढत होते.

ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा निघाली. शहरात विविध चौकात विविध संघटनांद्वारे पालखीचे स्वागत केले जात होते. भाविकांना पिण्यासाठी पाणी, शरबत तसेच अल्पोपहाराचीही सोय अनेक ठिकाणी कऱण्यात आली होती. शाम टॉकीज चौक, दिपक चौपाटी, भगतसिंग चौक (काठेड चौक), गाडगेबाबा चौक, सर्योदय चौक, टागौर चौक, तुटी कमान चौक, अणे चौक, खाती चौक मार्गे टिळक चौकात पालखी पोहोचली.

शोभायात्रेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
शिवतीर्थाजवळ पालखीचे मुस्लिम संघटनांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी हिंदू मुस्लिम एकतेच दर्शन घडून आले. तसेच यावेळी श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Comments are closed.