विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरच्या वाढत्या तक्रारी व रुग्णांची हेळसांड होत असताना वणीत खासगी कोविड केअर सेंटरचा एक पर्याय वणीकरांना खुला होणार होता. मात्र स्थानिक लोकांच्या विरोधामुळे सुरू होण्याआधीच खासगी कोविड केअर सेंटरचे काम थांबवण्यात आले. आज स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक नितीन चहाणकर यांच्या नेतृत्वात याबाबत आमदारांची भेट घेत याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा खासगी उपचाराचा पर्याय आता बंद झाला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाद्वारे वणीत खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी मागण्यात आली होती. यासाठी डॉ. महेंद्र लोढा व डॉ. गणेश लिमजे यांनी पुढाकार घेतला. वणीतील जिल्हा परिषद कॉलनी येथील सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य मागवण्यात आले होते. शिवाय या आठवड्यात ते सुरू होण्याचीही शक्यता होती.
कोविड केअर सेंटरला विरोध का?
परिसरात कोविड केअर सेंटर सुरू झाल्यास तिथून परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यास धोक्यात निर्माण होऊ शकतो. असा आरोप करत स्थानिकांचा होता. यासंदर्भात परिसरातील रहिवाशांनी नगरसेवक नितीन चहाणकर यांच्या नेतृत्वात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची रेस्ट हाऊस येथे भेट घेऊन याबाबत तक्रार केली. तसेच नवीन सुरू होणा-या खासगी रुग्णालयास परवानगी रद्द करावी अशी मागणी केली. अखेर स्थानिकांचा विरोध बघून संचालकांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
गैरसमजुतीतून स्थानिकांचा विरोध – डॉ. महेंद्र लोढा
कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा वेळ जातो. मात्र सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच संपूर्ण व्यवस्था असल्याने आम्ही या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. स्थानिकांचा विरोध हा गैरसमजुतीतून आहे. संपूर्ण रुग्णालय कॉन्टेन्मेंट करून तसेच हॉस्पिटलचा परिसर सिल करून तिथे उपचार केले जाणार होते. कोरोनाच्या रुग्णांना वेळीच योग्य तो उपचार मिळणे गरजेचे असते. याचा परिसरातील रुग्णांना फायदा झाला असता. शिवाय आमची संपूर्ण चमू जीव धोक्यात घालून उपचार करण्यास तयार असताना याला विरोध होणे अनपेक्षीत होते. त्यामुळे अखेर आम्ही कोविड केअर सेंटरचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
– डॉ. महेंद्र लोढा
शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याने परिसरातील रुग्ण नागपूर, चंद्रपूर येथे खासगी उपचारासाठी धाव घेत आहे. मात्र तिथेही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बेड उपलब्ध नाहीत. आता खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयातही बेडसाठी अनेक दिवसांची वेटिंग आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने कोरोनामुळे रुग्णांना जीवही गमवावा लागला आहे. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरबाबत रुग्णांच्या तक्रारी सुरू असताना दुसरीकडे खासगी कोविड केअर सेंटरलाही स्थगिती आल्याने याचा गंभीर रुग्णांना चांगलाच फटका बसू शकतो.
स्थानिक राजकारणामध्ये कोविड केअर सेंटरचा बळी?
वणीत खासगी कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती समोर येताच याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. याला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. तर स्थानिक ठिकाणीच अत्याधुनिक उपचार मिळणार असल्याने याचे स्वागतही करण्यात येत होते. तसेच परिसरातील रुग्णांना शासकीय सह खासगी उपचाराचा पर्यायही खुला झाला होता. दरम्यान यात राजकारण शिरल्याने खासगी कोविड केअर सेंटरचा बळी गेल्याची चर्चाही चांगलीच रंगत आहे. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये सोयी सुविधांचा अभाव असताना दुसरीकडे जाणूनबुजून खासगी कोविड केअरचा पद्धतशीर ‘गेम’ करण्यात आला अशी ही चर्चा सध्या रंगत आहे. या सर्व घडामोडीत तालुक्यातील रुग्णांसाठी सुरू होणार खासगी पर्याय मात्र बंद झाला.