पोलिसांनी अडविले आणि त्यांनी चक्क रस्त्यावर झोपून केला अभ्यास

वणीच्या विद्यार्थ्यांने पुणे येथे केलेल्या अनोख्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा

जितेंद्र कोठारी, वणी : दिवाळीत गावी येण्यासाठी मित्रासह दुचाकीवर बसून स्टेशन जाणाऱ्या तरुणाची दुचाकी पोलिसांनी अडविली. गाडीचे कागदपत्र ,ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रेन रिजर्वेशनचे तिकीट दाखवूनही पोलिसांनी दुचाकी सोडली नाही. अखेर ज्या ट्रेनमध्ये तो बसणार होता ती निघून गेली. पुणे पोलिसांच्या कारवाई विरोधात त्या तरुणाने चक्क  येथील रस्त्यावर झोपुन अभ्यास करण्याचे आंदोलन सुरु केले. राहुल शामराव धांडे असे या तरुणाचे नाव असुन तो वणी तालुक्यातील रासा गावाचा रहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की, रासा येथील राहुल धांडे हा तरुण पुणे येथे राहून एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. दिवाळीला गावी येण्यासाठी तो आपल्या एका मित्रासह मोटारसायकलवर पुणे रेल्वे स्टेशन जाण्यासाठी निघाला. वाटेतच अलका चौकावर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांची बाईक अडविली. राहूल यांनी गाडीचे कागदपत्रे व ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना दाखविले. मात्र पोलिसांनी दुचाकीवर प्रलंबित दंड भरण्याचा तगादा लावला. राहुल धांडे यांनी सद्य माझ्याकडे पैसे नाही, मी नंतर ऑनलाइन भरून देइल तसेच 3.15 वाजता माझी ट्रेन आहे. अशी विनंती केली. मात्र वाहतूक पोलिसांनी त्याला अर्धा तास अडवून ठेवला. त्यामुळे राहुल धांडे ज्या ट्रेनमध्ये येणार होता ती निघून गेली.

पुणे वाहतूक पोलिसांच्या कारवाई आणि ट्रेन सुटल्यामुळे चिडलेल्या तरुणाने थेट रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन करून वाहतूक पोलीसांचा निषेध केला. रस्त्यावर झोपून अभ्यास करणाऱ्या युवकाच्या आंदोलन बाबत माहिती मिळताच विविध मीडिया प्रतिनिधी अलका चौकात पोहचले. तर इकडे या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे पुणे पोलिसांची भंबेरी उडाली. अखेर पोलिसांनी त्या तरुणाची समजूत काढून व वणी येथे पाठविण्याची व्यवस्था केल्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेतले.

वणी तालुक्यातील रासा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील राहुल शामराव धांडे हा एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. आणि त्यासाठी तो पुणे येथे राहून अभ्यास करीत आहे. दिवाळीसाठी घरी येताना त्याच्या सोबत अशी घटना घडली. राहुल धांडे यांनी केलेल्या आंदोलनाची बातमी विविध मराठी वृत्त वाहिन्यावर प्रसारित झाली. त्यामुळे या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली.

Comments are closed.