12 वीत शिकणा-या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

सुसाईड नोट मध्ये आई वडिलांची माफी मागत संपवली जीवनयात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रांजली यशवंत राजूरकर (17) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नीट परीक्षेची चंद्रपूर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये तयारी करीत होती. मृत्यूआधी तिने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून तिने एक व्हिडीओ तयार केल्याचेही बोलले जात आहे. या घटनेमुळे मारेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहिती नुसार, प्रांजली यशवंत राजूरकर (17) ही गोंडबुरांडा ता. मारेगाव येथील रहिवासी होती. तिने मारेगाव येथील एका विद्यालयातून 10 वी केले होते. 10 वी नंतर नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने चंद्रपूर येथे प्रवेश घेतला होता. सध्या ती 12 व्या वर्गात होती. रामनगर येथील इन्स्पायर या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या खासगी कोचिंग सेंटरमध्ये ती क्लास करीत होती. मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी प्रांजली ही तिच्या मामाच्या घरी गेली होती. त्यानंतर ती संध्याकाळी वसतीगृहात परतली.

बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी तिच्या मैत्रिणीने तिला क्लाससाठी विचारणा केली. मात्र थकवा जाणवत असल्याचे कारण देत ती क्लासला गेली नाही. त्यानंतर ती वसतीगृहातील खोलीतच होती. दिवसभर प्रांजली रुमबाहेर आली नाही. त्यामुळे वसतीगृहातील मुलींनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलींना संशय आला. त्यांनी याची माहिती वसतीगृहाच्या कर्मचा-यांना दिली. अखेर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचा-यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी प्रांजली ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुसाईड नोट व व्हिडीओ केला तयार
आत्महत्येपूर्वी प्रांजलीने तिच्या आईबाबांच्या नावे चिठ्ठी लिहिली. यात तिने अभ्यासाचे टेन्शन आले आहे. त्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे. असे लिहिले होते. तसेच तिने आत्महत्ये पूर्वी एक व्हिडीओ केल्याचीही माहिती आहे.

कोचिंगच्या व्यवस्थापनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आज प्रांजलीचा मृतदेह गोंडबुरांडा येथे आणण्यात आला. तिच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रांजली हिच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ आहे. या घटनेमुळे मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.