दुःखाचा डोंगर पार करीत तिने गाठलं यशाचं शिखर !

मेंढोलीच्या नीताचा संघर्षमय यशस्वी जीवन प्रवास

0

विलास ताजने, वणी: असे म्हणतात की, आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. दुसरे कोणी आपले जीवन घडविणार नाही. विशेषतः अनेक स्त्रियांच जीवन नैराश्याने ग्रासलेले असते. मात्र आत्मविश्वास, सामर्थ्य अंगी असेल तर निश्चितच दुःखी जीवनातही स्वप्ने साकार होतात. अशा अमाप दुःखांना बाजूला सारत स्वप्न साकार करणाऱ्या स्त्री शक्तीची ही प्रेरणादायी जीवनगाथा.

नीता अरुण घुगुल असे या प्रेरणादायी स्त्री शक्तीचे नाव. नीता ही वणी तालुक्यातील शिरपूर येथील लांडे गुरुजींची मुलगी. तर मेंढोलीच्या वासुदेवराव घुगुल गुरुजींची सून. नीताच शिक्षण जेमतेम बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (इलेक्ट्रिशियन) यांसह शिवणकला पूर्ण झालेलं.

मात्र असे म्हणतात की, शिक्षण हे जीवनात कधीही उपयोगी पडतं. ते वाया जात नाही. नेमकं नीताच्या बाबतीत तेच घडलं. वैवाहिक जीवनात विधात्याने तिच्या पदरात दुःखाचा डोंगरच टाकून दिला. मात्र न डगमगता तो खडतर डोंगर पार करीत असताना परमेश्वराने यशाचा झेंडा शिखरावर फडकविण्याची शक्ती नीताला दिली.

नीताचे पती अरुण यांचा शेती व्यवसाय. नीताचे सुरुवातीचे वैवाहिक जीवन आनंदात गेले. मात्र नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. नव्हे तर ती वेळच परीक्षा घेणारी असते. आनंदी संसाराला दृष्ट लागली. सुखाचा संसार काहीसा दुःखात बदलला.

मात्र संसारात सुखाचे दिवस खेचून आणण्यासाठी नीताने आपल्या आयटीआयच्या शिक्षण पात्रतेवर नोकरीसाठी धडपड सुरू केली. दरम्यानच्या काळात संसाररूपी वेलीवर दोन फुलं फुलली. ‘हम दो हमारे दो’ असा संसाराचा गाडा सुरू झाला.

अशातच तिच्या प्रयत्नाला यश मिळाले. अन् नीताला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ऑपरेटर पदावर नोकर मिळाली. पुन्हा ‘दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल’ या गीताच्या ओळी प्रमाणे सुख आलं. पण क्षणभंगुर ठरलं. कदाचित नियतीला सुख मान्य नसावं.

पती गावात शेतीव्यवसात रमले तर नीता पांढरकवडा वीज कंपनी कार्यालयात नोकरी करू लागली. पतीचे मेंढोली ते पांढरकवडा असे ये – जा असायचे. अगदी सर्व काही मनासारखं घडू लागल्याने साहजिकच कुटूंबात आनंदी आनंद असणारच. मात्र एके दिवशी नको ते घडले. वणी मारेगाव रस्त्यावर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात पतीचे निधन झाले.

आईवडिलांना एकुलता एक असलेला मुलगा काळाने हिरावून नेला. कुटुंबावर दुःखाचा जणू काही डोंगरच कोसळला. जीवनात अडचणी निर्माण झाल्या. कधी शारीरिक आजाराने त्रस्त केलं. मात्र अडचणी दूर करण्याच सामर्थ्य, बुद्धी तिच्या जवळ असल्याने ती कशीबशी सावरली.

मात्र जीवनात ऊनसावलीचा खेळ तिच्या वाट्याला कायमच आला. जीवन जगणे किती कठीण असते. हे तिने प्रत्यक्ष अनुभवले. आज वयाची पन्नाशी पूर्ण करणारी नीता वणीच्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात ‘सिनिअर ऑपरेटर’ पदावर कार्यरत आहेत.

वीज कामगार, अधिकारी अशा हजारो कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या संघटनेत देखील काम करते.वणी बहुगुणीशी बोलताना ती म्हणाली, “जीवनातील चढउतार कधी कधी एवढे तीव्र असतात की, स्वसामार्थ्य तर सोडाच, मनुष्य स्वतःला हरवून बसतो. जीवनात स्वप्ने साकार होतात.

मात्र बहुतेक लोक स्वप्नाची संभावना ‘दिवा स्वप्न’ असे करतात.आणि स्वप्नापासून दूर पळतात. मात्र प्रत्यक्षात स्वप्नच आपल्याला ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी प्रेरणा देतात. शिक्षणाने आणि संघर्षाने आपण सामर्थ्यवान बनतो. मी आज स्वबळावर उभी आहे. ते केवळ माझ्या व्यावसायिक शिक्षणामुळे म्हणून मुलींनी पदवी शिक्षणासह व्यावसायिक शिक्षणालाही महत्त्व दिलं पाहिजे.”

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सिनिअर ऑपरेटर पदावर कर्तव्य पार पाडत ती वीज कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार संघटनेत काम करते. निश्चित ती अष्टपैलू आहे. ती शक्तीस्वरूपी आहे. स्त्रीयांना प्रेरणादायी आहे. ती बहुगुणी आहे. म्हणून तिच्या कार्याला, यशस्वी लढ्याला वणीबहुगुणीचा मानाचा मुजरा.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.