अनुच्छुक उमेदवाराला भाजपचे तिकीट, थोडी खुशी थोडा गम

सहानुभूतीची लाट व 'भय्या'ची परतफेड ठरणार निर्णायक

निकेश जिलठे, वणी: एकीकडे सर्वच इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यात व्यग्र आहे. त्यातल्या त्यात भाजपचे तिकीट मिळावे यासाठी मोठी चढाओढ आहे. मात्र दुसरीकडे जाहीरपणे पक्षाचे तिकीट नको म्हणणारे सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे भाजपचे तिकीट मिळालेय. एका अनुच्छुक उमेदवाराला तिकीट मिळाल्याने भाजपच्या एका गोटात प्रमाणात नाराजी आहे. तर हंसराज अहीर यांचे तिकीट कापले गेल्याने ‘भय्या’ विरोधी गटात मात्र उत्साह दिसून येत आहे. गेल्या लोकसभेला ‘भय्या’ला पाडण्यात ‘भाऊं’नी हातभार लावल्याची कुजबूज सुरु होती. आता या निवडणुकीत ‘भय्या’ याची परतफेड करणार का? अशी चर्चा मतदारसंघात रंगायला सुरुवात झाली आहे.

एक वर्षांआधी सुधीर मुनगंटीवार यांचे वणीत जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. तेव्हाच सुधीर मुनगंटीवार यांना पक्षश्रेष्ठींकडून लोकसभेसाठी सज्ज राहाण्याचा आदेश आल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. मात्र सुधीर मुनगंटीवार लोकसभेबाबतच्या प्रश्नाला बगल देत होते. नुकतेच वणीजवळील निंबाळा येथे रुद्राक्ष बनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात देखील त्यांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर बोलून दाखवले होते. तर तिकीट जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मला तिकीट मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय, असे जाहीर वक्तव्य करून ते अनुच्छुक असल्याची त्यांनी स्पष्ट केले होते.

लढत सोप्पी नाही…
काँग्रेने अद्याप उमेदवारांची लिस्ट जाहीर केली नसली तरी प्रतिभा धानोरकर यांचे नाव जवळपास फिक्स मानले जात आहे. काही महिन्यांआधी बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याने प्रतिभा धानोरकर यांना असलेली सहानुभूतीची लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातील कोल्ड वॉर सर्वश्रुत आहे. पदाधिका-यांची कार्यकारिणी घोषीत झाली की त्यात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा नेहमीच रंगते. शिवाय गेल्या निवडणुकीत भाऊंची भय्यांना विशेष मदत न झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे भय्या याची परतफेड करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

राज्यातील नेत्याला केंद्रात भाव नाही…
असं म्हणतात की राज्यातील राजकारणात सक्रीय असणारे नेते केंद्रात जाण्यास अनुछुक असतात. याचे कारण म्हणजे त्यांना तिथे मिळणारा भाव. नितीन गडकरी सारखे एखादे ज्येष्ठ नेते याला अपवाद असतात ज्यांना कॅबिनेट मंत्री दिलं जातं. मात्र दुस-या फळींच्या हाती केवळ राज्यमंत्रीपदच दिलं जातं. अनेक वर्ष तर विशेष महत्त्व नसलेलं अवजड उद्योग मंत्रायल हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांना किंवा ज्येष्ठ दिग्गज नेत्यांच्या माथी मारल्याचा इतिहास आहे. त्यापेक्षा येत्या सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. ती जिंकून पुन्हा राज्यात कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी कोणत्याही नेत्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.

दुसरी भीती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. केंद्रात कुठल्याची कामाचं एकहाती श्रेय हे नरेंद्र मोदींना दिलं जातं. अनेक ठिकाणी तर विकास कामाच्या पेपरमधल्या पानभर जाहिरातीत संबंधित मंत्र्याचा फोटो देखील गायब असतो व त्याऐवजी केवळ नरेंद्र मोदींचाच चेहरा जाहिरातीत दिसतो. त्यामुळे कोणत्याही कामाचे श्रेय मंत्रिमंडळातील इतर कोणत्याही मंत्र्यांना मिळत नाही. शिवाय केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी मोठी कॉम्पिटिशन असते. त्यामुळे मंत्रिपद मिळालं तर अशी अनेक कारणं असल्याने राज्यातील नेते हे केंद्रात जाण्यास अनुच्छुक असतात.

‘भाऊं’ची विकासाची गॅरन्टी
सुधीर मुनगंटीवार यांची धडाडीचे नेते म्हणून ओळख आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी विविध विकासकामे आपल्या मतदारसंघात केली. त्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे. एखादा मोठा प्रकल्प आपल्या भागात आणावा, अशी अपेक्षा खासदारांकडून केली जाते. सुधीर मुनगंटीवार हे निवडून आल्यास परिसराचा विकास होईल, अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. हे सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी असलेलं सर्वात मोठी जमेची बाजू आहे. 

भाऊंना लोकसभा लाभी नाही
सुधीर मुनगंटीवार यांनी 1989 मध्ये व 1991 मध्ये चंद्रपूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनी पराभव केला होता. 1995 साली त्यांनी चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ते विजयी झाली. तेव्हा पासून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कधीही पराभव पाहिला नाही. 

 

Comments are closed.