वणी परिसरातीत खून, दरोडे ठरतायेत दहशतीचे कारण

गुन्ह्याची उकल करण्यास पोलीस प्रशासन सातत्याने अपयशी

विवेक तोटेवार, वणी: शहरात आधी चोरीच्या घटना व्हायच्या मात्र आता या चोरीच्या घटनांची जागा दरोड्यांनी घेतली आहे. एप्रिल महिन्यात लालगुडा येथे धाडसी दरोडा पडला होता. या प्रकरणाची अद्याप उकल झालेली नसताना पुन्हा पळसोनी फाट्याजवळ गेल्या आठवड्यात एका गोदामावर दरोडा पडला. या घटनेत रखवालदाराचा खूनही करण्यात आला. एकीकडे चोरी, दरोड्याच्या घटना वाढत असून दुसरीकडे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात सातत्याने अपयश येत असल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वणीकर चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. घरफोडी, दुचाकी चोरी या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. सुविधा कापड केंद्र, महेश सिलेक्शन या दुकानातील धाडसी चोरीसह परिसरात झालेल्या शेकडो घरफोडीच्या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. दर वेळी नवीन ठाणेदारांकडून घरफोडीच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा वणीकर करतात. मात्र ही अपेक्षा दरवेळी फोल ठरताना दिसत आहे.

वणीकरांच्या पदरी निराशाच
वणीत नवीन ठाणेदारांनी पदभार घेताच सर्वप्रथम चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी घरफोडी करून सलामी दिली. वणीतील नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे भरदिवसा धाडसी चोरी झाली. त्यानंतर सातत्याने घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटना सुरु आहेत. फाले ले आऊट येथील घटनेत चोरट्यांनी चोरी रोखणा-यांवर हल्ला केला. तर लालगुडा येथील एका वृद्धाच्या घरी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला. 28 एप्रिलच्या रात्री पाळसोनी फाट्यावर गोदामाच्या रखवालदाराची हत्या करून चोरी करण्यात आली. या घटनेने वणीत एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन वणीच्या पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांची बैठक घेतली. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी चोरट्यांचा शोध घेण्यास आले होते. पण आता या घटनेला 10 दिवस होत असताना खुनी अद्याप मोकाटच आहे. त्यामुळे वणीकरांमध्ये चोरटे, दरोडेखोरांची दहशत दिसून येत आहे.

प्रकरणाचा तपास वेगाने सुरू – ठाणेदार
वणीमध्ये पळसोनी फाट्यावर झालेल्या खुनाचा तपास तीव्र गतीने सुरु आहे. याकरिता 5 अधिकारी काम करीत आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत दोन कर्मचारी काम करीत आहे. याशिवाय इतर गुन्ह्याचा तपास देखील सुरु आहे. परिसरातील अवैध धंदे करणा-यांवर सातत्याने कारवाई होत आहे.
– अनिल बेहराणी, ठाणेदार, वणी

पावसामुळे उकणी-वणी रस्ता बंद, वेकोलिविरोधात रोष

Comments are closed.