अखेर विषारी औषध प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

कुंभा येथील शेतक-याची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी 

 भास्कर राऊत, मारेगाव: तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या शेतक-याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. तालुक्यातील कुंभा येथील रहिवाशी असलेले मारोती लालाजी कोकूडे, वय 53 वर्षे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 11 मार्च रोजी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांचे यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मारोती कोकुडे हे शेती करायचे. मागील काही वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ आणि कमी होत असलेले उत्पन्न यामुळे कोकुडे हे आर्थिक विवंचनेत सापडलेले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगरही वाढला होता. जगायचे कसे हा प्रश्न त्यांना पडलेला होता. अशातच दि. ११ मार्चला मध्यरात्रीच्या वेळेस घरची सगळी मंडळी झोपलेली असतांना मारोती यांनी कीटकनाशक औषधी प्राशन केले. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वणी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशातच दि. १४ मार्चचे रात्रीचे वेळेस मारोती यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे दोन मुले, सुना आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे.

तालुक्यातील आत्महत्यांचे ग्रहण सुटता सुटेना
तालुक्यामध्ये सतत आत्महत्या होत असते. आठवड्यामध्ये एक ते दोन आत्महत्या जवळपास ठरलेल्याच असतात. यावर उपाययोजना होऊन त्या कमी होण्यापेक्षा त्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच घरच्या कमावत्या आणि होतकरू व्यक्तीची आत्महत्या ही मनाला चटका देऊन जाते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.