जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील प्रगती नगर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. गोपाळ रमेश टोंगे (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक गोपाळ हा मुळचा खांदला येथील रहिवाशी होता. तो बालपणापासून त्याचे मोठेबाबा यांच्या प्रगती नगर येथील घरी राहायचा. त्याच्या मोठेबाबांचे 2-3 वर्षांआधी निधन झाले. त्यामुळे घरी मोठी आईसह तो राहायचा. तो वरोरा येथे नोकरी करीत असल्याची माहिती आहे.
नेहमी प्रमाणे गोपाळ घराच्या मागच्या रूममध्ये झोपायला गेला. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान त्याची मोठी आई त्याला उठवायला गेली. मात्र त्याने दार उघडले नाही. झोपून असेल असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. एखादी तासानंतर त्या पून्हा गोपाळला उठवायला गेल्या. मात्र यावेळीही त्याने प्रतिसाद दिला नाही. गोपाळच्या मोठी आईने ही बाब भाडेकरूंना सांगितली.
त्यांनीही दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावले असता आत गोपाळने चादरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत लगेच वणी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
गोपाळने रात्री उशिरा किंवा पहाटे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. गोपाळ हा अविवाहित होता. दोन तीन वर्षांआधीच त्याच्या मोठे वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. आता गोपाळनेही आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Comments are closed.