नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या

दहावीत 90 टक्के तर 12 वी मध्ये 65 टक्के गुणांनी पास झाली होती युवती.... सकाळी घरी कुणी नसताना ओढणीने गळफास घेऊन संपवले जीवन

जितेंद्र कोठारी, वणी: लालगुडा येथील एका युवतीने सकाळी घरी कुणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सेजल अनिल सालूरकर (17) असे या युवतीचे नाव आहे. ती नुकतीच 12 वी मध्ये उत्तीर्ण झाली होती. मात्र परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सेजलने दहावी 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. सेजलच्या या टोकाच्या पावलामुळे तिच्या आईवडिलांना जबर धक्का बसला असून तिच्या आईवर सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

सेजल ही युवती लालगुडा येथील रहिवाशी होती. तिचे वडील अनिल हे मिस्त्री काम करतात तर आई ही मोलमजुरी करते. सेजल ही शहरातील लोटी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत 12 वीला होता. बुधवारी 12 वीचा निकाल लागला होता. यात सेजल 65 टक्के गुण घेऊन पास झाली होती.

आज गुरुवारी दिनांक 9 जून रोजी सकाळी सेजलचे वडील हे कामासाठी घरून निघून गेले होते. तर 10 वाजताच्या सुमारास आई देखील कामानिमित्त घरातून बाहेर पडली होती. घरी कुणी नसल्याची संधी साधून सेजलने घराच्या छताला असलेल्या पंखा लावण्याच्या हुकला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी 11 वाजताच्या सुमारास शेजारी घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

सेजलला दहावीत मिळाले होते 90 टक्के गुण
सेजल ही अभ्यासात खूप हुषार होती. तिने विवेकानंद विद्यालयातून 10 वी केले. तिला 10 वी मध्ये 90 टक्के गुण होते. त्यानंतर तिने लोटी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला होता. बुधवारी लागलेल्या निकालात तिला 65 टक्के गुण मिळाले होते. परीक्षेत गुण कमी मिळाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.

मुलीच्या जाण्याने स्वप्नांचा चुराडा झाला – मृतकाचे वडील
मला दोन मुली आहेत. दोन्ही ही मुली अभ्यासात हुषार आहेत. दोन्ही मुलीला आम्ही शिक्षण किंवा इतर कोणत्याही गोष्टीत कमी पडू दिले नाही. मोठी मुलगी ही यवतमाळ येथे शिक्षण घेते. सेजल अभ्यासात हुषार होती. काल निकाल लागल्यनंतरही घरात निकालाचा कोणताही विषय नव्हता. शिवाय सेजलची दैनंदिन दिनचर्चा ही सामान्य होती. मात्र कदाचित मुलीच्या मनात निकालाबाबत खंत असावी. मुलगी असे काही टोकाचे पाऊल उचलेल अशी कुणालाही कल्पना नव्हती. मुलीने खूप शिकावं हीच आमची इच्छा होती. मात्र तिने उचललेल्या या पावलामुळे आमच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्यास कुणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका, अशी मी विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो.
– अनिल सालूरकर, मृतक सेजलचे वडील

दरम्यान सेजलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच सेजलच्या आईला हा धक्का सहन झाला नाही. तिच्या आईची प्रकृती अचानक ढासळली असून तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. सेजलने उचललेल्या या पावलामुळे लागलुडा गावावर शोककळा पसरली आहे. सध्या सेजलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून प्रकरणाचा वणी पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

Comments are closed.