धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत
किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतक-याची पायपीट
जितेंद्र कोठारी, वणी: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ सुरू केली. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात. लाभार्थी शेतकऱ्यांची नोंद प्रत्येक तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय पोर्टलवर केली आहे. मात्र, जिवंत असलेल्या पिल्कीवाढोणा येथील लाभार्थ्याची चक्क मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. सध्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आपल्या अस्तित्वाची लढाई सदर शेतकरी लढत आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पिल्कीवाढोणा (पठारपूर) येथील शेतकरी दादाजी आत्माराम नागतुरे (53) यांची गावात गट क्र. 153 मध्ये 3 एकर 20 गुंठा शेती आहे. अल्प भूधारक असल्यामुळे त्यांची निवड पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून करण्यात आली. त्या अनुषंगाने लाभार्थी दादाजी नागतुरे यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक खात्यात एप्रिल 2020 मध्ये तीन हप्त्याचे 6 हजार रुपये जमा झाले.
वर्ष 2020-21 मध्ये शासनाकडून दोन हप्ते निर्गमित करण्यात आले, मात्र नागतुरे यांच्या बँक खात्यात सदर रक्कम जमा झाली नाही. दादाजी नागतुरे यांनी पटवारी व महसूल विभाग वणी येथे माहिती काढली असता शासन दरबारी शेतकरी दादाजी आत्माराम नागतुरे हे मयत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी दादाजी नागतुरे हे मयत असल्यामुळे त्यांचा खाता निष्क्रिय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर वास्तविक शेतकरी दादाजी नागतुरे जिवंत असून सन्मान योजनेच्या निधी मिळणे करीता वणी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. दरम्यान याबाबत ‘वणी बहुगुणी’ने राहुल माहुरे, तलाठी, पठारपूर गट ग्राम पंचायत यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या वैद्यकीय उपचार घेत असल्याने याबाबत बोलण्यास नकार दिला.
नाव दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले
एकाच नावाचे दोन व्यक्ती असून एकाची मृत्यू झाल्यामुळे तलाठीकडून अनावधानाने पिल्कीवाढोणा येथील शेतकरी दादाजी आत्माराम नागतुरे यांची मयत लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. याबाबत नाव दुरुस्तीसाठी मुंबई येथील संबंधित पोर्टल संचालक कंपनीकडे माहिती पाठविण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात दादाजी नागतुरे यांच्या बँक खात्यात सन्मान निधीची उर्वरित रक्कम जमा होईल.
महेश रामगुंडे: नायब तहसीलदार (तात्कालीन), वणी
हे देखील वाचा: