वणीमध्ये जनावरांवर ऍसिड फेकल्याचा संशय

प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण, कारवाई करण्याची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: शहरात तीन ते चार गायी जखमी अवस्थेत फिरत असून या गायींवर हल्ला करून जखमी केल्याचा आरोप होत आहे. शिवाय सदर हल्ला अ‍ॅसिड फेकून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शहरातील प्राणीमित्र आणि गोरक्षक संघटनांकडून या जखमी जनावरांवर उपचार केले जात आहे. याबाबत योग्य ती चौकशी करावी यासाठी निवेदन देण्यात आले असून असे कृत्य करणा-यांवर  लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरात अनेक लोक गायी पाळतात. काही गो पालकांची जनावरे शहरात मोकाट फिरतात. चार-पाच दिवसांआधी या 3-4 गायी जखमी अवस्थेत काहींना आढळून आल्यात. त्यांच्या पाठीवर गंभीर जखम आहेत. या जखमा ऍसिड फेकल्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवसभराच्या पावसामुळे या जखमा चिघळत असून या जखमा अंगावर घेऊनच ही मुके जनावरे शहरात फिरत आहेत.

ही घटना उघडकीस येताच नगर पालिकेच्या वतीने या जनावरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अनेकदा घरी फुल झाडांना नुकसान केल्यातून गायींवर हा हल्ला करण्यात येतो. बरेचदा प्राण्यांवर उकळते पाणीही टाकले जाते. शिवाय काही रोंगामुळे ही अशा जखमा होऊ शकतात अशी माहिती मिळत आहे. मात्र याबाबत सीसीटीव्हीचा आधार घेऊन तसेच पशू वैद्यकीय अधिक-यांनी योग्य ती चौकशी केल्यास जखमांचे खरे कारण लक्षात येऊ शकेल.

याबाबत श्री गुरू गणेश गोशाला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वैद्यकीय पशू अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले आहे. अशा घटनांचा जाहीर निषेध करीत याची चौकशी करून हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी गुरु गणेश गौशालेचे सचिव प्रणव पिंपळे, शुभम इंगळे, पियुष चौहान, चेतन डोरलीकर, सौरभ कोल्हे, स्वप्नील रामगिरवार, प्रतीक कोठारी, सूरज नारडेवार, रोशन मोहितकर यांच्यासह ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.