अखेर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला, उपोषण मागे
वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी भेट दिल्यानंतर उपोषण मागे
विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये 11वीत अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी 14 ऑगस्ट पासून स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, पालक यांनी साखळी उपोषणाला सुरवात केली होती. आज उपोषणच्या 7 व्या दिवशी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
उपोषण सुरू असताना अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या सोबत ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या कॅम्पेनच्या कायकर्त्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न लवकरच निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या गंभीर प्रश्ननाबाबत आपण जातीनं लक्ष देऊ असे आश्वासन बचू कडू यांनी दिले तसेच अमरावती विभागाचे उपसंचालक राठोड साहेबांशी संपर्क करून याबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.
रविवारी बाळू धानोरकर यांनीही अमरावती विभागाचे उपसंचालकांशी त्वरित भ्रमनध्वणीवरून संपर्क साधून उर्वरित 28 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तोडगा काढला. कायद्याच्या चौकटीत राहून लोकमान्य टिळक महाविद्यालयात 120 अनुदानित विद्यार्थ्यांपैकी 10% म्हणजे 12 विद्यार्थी एसपीएम मध्ये 80 अनुदानित विद्यार्थ्यांपैकी 10%म्हणजे 8 विद्यार्थी अशा एकूण 20 विद्यार्थ्यांना तर कायद्यात राहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर उर्वरित 8 विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवून अनुदानित तुकडीत सामील करून घेतल्या जाईल.
जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण स्वतः जबाबदारी घेऊन उपोषणकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून उपोषणाला बसणार असल्याचे अश्वासन यावेळी बाळू धानोरकर यांनी दिले. बाळू धानोरकर त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्वप्निल धुर्वे यांनी आपले उपोषण नारळ पाणी पिऊन सोडले.
स्वप्नील धुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की…
आपल्या विधानसभा क्षेत्रातील आमदार हा लढा येऊन पाहण्यासही तयार नाही आणि जे वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार नाहीत ते याबाबत आपली सहानुभूती दाखवून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जबाबदारी घेतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या लढ्याला यश प्राप्त झाले असले तरी जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न येणार तेव्हा तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहू. तसंच हा प्रश्न पुढील वर्षी निर्माण होणार नाही याबाबतही आम्ही चर्चा करणार.
गेल्या अनेक वर्षांपासून ही 11वी प्रवेशाची समस्या सुरू आहे. परंतु राजकीय नेते फक्त आपले हित जोपासण्यात व राजकारण करण्यातच गुंतले आहेत. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यात त्यांना कोणत्याही प्रकारचा रस दिसत नाही. अखेर स्थानिक आमदारांच्या उदासीनतेमुळेच दुस-या मतदार संघाचे आमदार बाळू धानोरकर यांना या समस्येकडे लक्ष द्यावे लागते आहे यातून आमदरांविषयीचा चुकीचा संदेश स्थानिकांमध्ये जात आहे.