वणी तहसील कार्यालय ठरले विभागात अव्वल… शासनाच्या पुरस्काराने गौरव

तत्पर, काटेकोर, कल्पक कृती आराखडा व नावीन्यपूर्ण उपक्रमाचा सन्मान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा सांगितला होता. त्यानुसार वणी तहसील कार्यालयाने तो सादर केला. तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात तो अमरावती विभागात सादर झाला. अत्यंत कल्पक अशा या कृती आराखड्यासाठी वणी तहसील कार्यालयाला अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळाला. संपूर्ण अमरावती विभागातून वणी कार्यालय सर्वच बाबतीत तत्पर, काटेकोर आणि अग्रेसर आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार एक ते सतरा मुद्द्यांची अद्ययावत माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित सेवांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसे कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना विविध दाखले 48 तासांच्या मुदतीतून देण्यात येत आहेत. महाखनिज पोर्टल व तात्पुरत्या गौण खनिज उत्खनन परवान्यांना 24 तासांच्या आत मान्यता देत देण्यात येत आहे. अभिलेखागारातून देण्यात येणारे स्कॅनिंग झालेले नकलीचे अर्ज त्याच दिवशी निकालात काढण्यात येत आहेत.


बीपीएमएस संकेतस्थळावर प्राप्त प्रकरणे तपासून त्याच दिवशी निकाली काढली जात आहेत. तहसील कार्यालयाला नवीन वाहनदेखील मिळालं आहे. या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू झाले. विशेष म्हणजे ते 24 तास सुरू असते. या कक्षात सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाबद्दल अत्यंत व्यापक स्वरूपात जनजागृती देखील करण्यात आलेली आहे. यात प्राप्त झालेल्या तक्रारी अवघ्या 24 तासांत निकाली काढण्यात येतात.

इथं कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्याची उत्तम व्यवस्था आहे. कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहदेखील उपलब्ध आहेत. नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून विविध विभागांचे नामफलक आणि दिशादर्शक लावण्यात आलेले आहेत. बुधवार आणि गुरुवार अशा आठवड्यातून दोन दिवसांना क्षेत्रीय भेटी होतात. जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधी 32 क्षेत्रीय भेटी झाल्यात. यात 146 पैकी 106 शाळा आणि अंगणवाडी यांना भेट देऊन तिथल्या समस्या निकाली काढल्यात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रं, ग्रामीण रुग्णालयं, उपकेंद्रं यांना भेटी देण्यात येतात. तिथली सर्व व्यवस्था पाहिली जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यातील सर्व 101 ग्रामपंचायतींना तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्यात. लोकसहभागातून पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त केलेत. कार्यालयातील पाच अधिकारी आणि 21 कर्मचारी हे ई-ऑफिसचा शंभर टक्के वापर करतात. प्रकरणाचा द्विस्तरीय निपटारा करण्यासाठी महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी आणि तहसीलदार स्वतः जातीनं दखल घेतात. जानेवारीपासून पूर्ण शंभर टक्के विषय निकाली काढण्यात आलेत.

भालर येथील सूर्या केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना क्षेत्रीय स्तरावर आलेल्या प्रशासकीय तांत्रिक अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्यात. वणी उपविभागात असलेल्या सिमेंट उद्योगांना आणि पूरक उद्योगांना वाहतुकीस आणि व्यवसायास कोणता अडथळा येणार नाही, यासाठी कार्यालय प्रयत्न करत असते. दर महिन्याला उद्योजक आणि व्यापारी यांची उपविभागीय स्तरावर बैठक होते. तहसील कार्यालयात दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. खुल्या कोळशाच्या खाणीत साचलेलं पाणी परिसरातील कोणत्या नाल्यात सोडता येईल, याबाबतची पाहणी करण्यात आलेली आहे. पाणी नाल्यात सोडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे आणि शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. वणी तहसील कार्यालयाच्या या उपलब्धीसाठी तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार विवेक पांडे, रवींद्र कापशीकर, रामचंद्र खिरेकर, अशोक ब्राह्मणवाडे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.