जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती आहे. यामुळे अनेकदा दुचाकीस्वारकांचा किरकोळ अपघातही झाला आहे. शिवाय वराहांच्या मुक्त संचारामुळे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सविता ठेपाले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
शहरात मोकाट गाय, बैल यासह वराहांची संख्याही दिसेंदिवस वाढत आहे. पण प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. वराहांच्या समस्येमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. भर पावसाळ्यात मोकाट वराहांच्या समस्येमुळे वणीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नगर परिषदेद्वारा यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही.
गोवंशावर आळा घालण्यासाठी कोंडवड्याची व्यवस्था आहे. पण याकडे नगर पालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं कोंडवड्यात जनावरे नेणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारीही देण्यात आल्या. पण संबधित प्रश्नांवर तोडगा काढण्यात नगर परिषद पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे.
रस्त्यावरचे मोकाट गोवंश आणि वराह यामुळे दुचाकीस्वारांचे किरकोर अपघात झाले आहेत. महिला दुचाकीस्वारांनाही अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी राजाभाऊ बिलोरिया, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, वैशाली तायडे, वर्षा पांडे, मंदा दानव, शोभा बिरुडवार, बबिता पिंपळशेंडे, निर्मला मगरे, पायल कोकास, रामकृष्ण वैद्य यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.