सुशील ओझा, झरी: एक 22 वर्षीय महिलेचे आंघोळ करताना मोबाईलवर फोटो काढण्याची संतापजनक घटना साखरा येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद दौलत झाडे (35) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी 15 फेब्रुवारी रोजी साखरा येथे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान एक 22 वर्षीय महिला आंघोळ करीत होती. दरम्यान गावातीलच आरोपी प्रमोद दौलत झाडे (35) हा थेट महिला आंघोळ करीत असलेल्या बाथरुममध्ये घुसला व त्याने महिलेचे मोबाईलवर फोटो काढण्यास सुरुवात केली. सदर महिलेने आरोपी प्रमोद याला बाथरूम मधून बाहेर निघ व फोटो डिलिट कर अन्यथा आरडाओरड करेल अशी धमकी दिली.
धमकी मिळताच आरोपी तिथून निघून गेला. काही वेळानंतर आरोपी परत सदर महिलेच्या घरासमोर आला. त्याने मोबाईलवर काढलेले फ़ोटो दाखवून महिलेला नवऱ्याला सोडून पळून चल अन्यथा तुझे फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिली. पीडित महिलेचा पती संध्याकाळी 7 वाजता कामावरून घरी आला.
महिलेने घडलेली सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. पीडित महिलेने रात्री आपल्या पतीसोबत पोलीस स्टेशन गाठले व आरोपी विरोधात तक्रार दिली. पती दररोज कामानिमित्त बाहेर गावी जातात व उशिरा घरी परत येतात. दिवसभर घरात एकटीच राहत असल्याने आरोपी प्रमोद पासून जीवाला धोका आहे. याशिवाय आरोपी नेहमीच वाईट उद्देशाने पाहतो अशी तक्रार दिली.
पोलिसांनी प्रमोद दौलत झाडे विरुद्ध भादंविच्या कलम 354 (क), 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात जमादार अशोक नैताम करीत आहे.
हे देखील वाचा:
सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)