अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली तलाठी

प्रतिकूल परिस्थितीत परमडोहच्या समीक्षा उपासेची भरारी

विलास ताजने, वणी: आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा बहुतांश मुलामुलींचा ध्यास असतो. हाच ध्यास मनाशी बाळगून तिने अभ्यास केला. अन् स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. समीक्षा हनुमान उपासे ही वणी तालुक्यातील परमडोह येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची एकुलती एक लेक. तिचे पूर्व प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, परमडोह येथे झाले. लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिने सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथून बीएस्सीची पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण घेत असताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील तिने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.

२०२३ मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात समीक्षाची जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा अंतर्गत तलाठी पदासाठी निवड झाली. आपली मुलगी तलाठी झाल्याचे कळताच आईवडिलांसह ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जेव्हा पुरेशा सोयीसुविधा नसलेल्या खेड्यापाड्यात गरिबीत जीवन जगणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी असे यश मिळवते. तेव्हा अनेकांना निश्चितच कळत-नकळत प्रेरणा मिळते. यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या परमडोह गावातील ‘तलाठी’ होण्याचा मान मिळवणारी पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या यशाने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. समीक्षाच्या यशाबद्दल संदीप थेरे यांच्यासह ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.

Comments are closed.