शेतक-यांनो सावधान… शेतशिवारातील दुचाकीवर चोरट्यांचा डोळा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबत नाहीये. गेल्या दोन दिवसात दुचाकी चोरींच्या 3 घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना मारेगाव (कोरंबी), दुसरी उमरी तर तिसरी घटना वणीतील जैन ले आऊट येथील आहे. विशेष म्हणजे यातील दोन दुचाकी भरदिवसा चोरट्यांनी पळवल्या. जैन ले आऊट येथील दुचाकी रात्री पळवली असून सदर दुचाकी ही ईलेक्ट्रीक मोपेड आहे. नुकतेच वणी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी अजीत जाधव रुजू झाले आहेत. आधीच्या एकाही ठाणेदारांना दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करता आला नाही. नवीन ठाणेदारांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे

पहिली घटना ही मारेगाव (कोरंबी) येथील आहे. अरुण महादेव पावडे (52) हे सुकणेगाव येथील रहिवासी असून ते शेतकरी आहे. त्यांच्याकडे पॅशन प्रो (MH29 AL 3414) ही गाडी आहे. त्यांनी ही गाडी त्यांच्या एका परिचितांकडून 2017 मध्ये विकत घेतली होती. बुधवारी दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ते मारेगाव (कोरंबी) शिवारात गेले होते. तिथे त्यांनी मेनरोडवर गाडी ठेवली व ते त्यांच्या शेतात कामासाठी गेले. मात्र परत आल्यावर त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही.

दुसरी घटना ही उमरी शेतशिवारात घडली आहे. पुंडलीक बाळकृष्ण माथनकर (42) हे वणी तालुक्यातील उमरी येथील रहिवासी आहे. त्यांची उमरी शेतशिवारात शेती आहे. त्याच्या बहिण जावयांनी 15 वर्षांपूर्वी स्प्लेंडर (MH 29Q 5042) ही गाडी विकत घेतली होती. गुरुवारी दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ते उमरी शेतशिवारात शेतीच्या कामासाठी गेले होते. त्यांनी रोडच्या बाजूला गाडी लावली. मात्र परत आल्यावर त्यांना सदर ठिकाणी गाडी आढळून आली नाही. वरील दोन्ही प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तिसरी घटना घटना ही जैन ले आऊट वणी येथे घडली. शत्रुघ्न वर्मा हे ठेकेदार असून ते जैन ले आऊट येथील दुर्गामाता परिसरात राहतात. त्यांच्याकडे ग्रे रंगाची ईलेक्ट्रिक मोपेड (MH29 BY8230) आहे. नेहमी प्रमाणे घरासमोर गाडी लावली होती. रात्री ते झोपले होते. पहाटे ते उठले असता त्यांना गाडी घरासमोर दिसली नाही. आजपर्यंत लोक पेट्रोल गाडी चोरायचे. मात्र आता चोरट्यांनी आपला मोर्चा ईलेक्ट्रीक दुचाकींकडे वळवल्याने ईलेक्ट्रीक वाहनधारकांची चिंता वाढली आहे.

ठाणेदारांसमोर दुचाकी चोरट्यांचे आव्हान
शहरातील घरफोडी काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी दुचाकी चोरट्यांचा उच्छाद मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. दुचाकी चोरट्यांनी आपला मोर्चा आला शेतशिवाराकडे वळवला आहे. शेतीमध्ये जाण्यास रस्ता नसल्याने शेतकरी मुख्य रस्त्याला किंवा पांदण रस्त्यावर गाडी लावून शेतीच्या कामासाठी जातात. मात्र परत आल्यावर त्यांची दुचारी चोरीला गेल्याचे उघड होत आहे. नुकतेच पोलीस निरीक्षक अजीत जाधव हे वणीच्या ठाणेदार पदी रुजू झाले आहेत. आधीच्या एकाही ठाणेदारांना दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करता आला नाही. नवीन ठाणेदारांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा:

मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली

Comments are closed.