विलास ताजने, मेंढोली: वणी येथील आदर्श विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंशासन राबवून एक दिवस शालेय कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडली. याप्रसंगी मुख्याध्यापक म्हणून लक्ष्मी पारखी, शिक्षक म्हणून आचल देठे, श्रुती मालेकर, राखी जुनगरी, अंकित मांडवकर, संदीप गुप्ता आदी विद्यार्थ्यानी शालेय कामकाज पाहत विध्यार्थ्यांना विविध विषयाच्या शिक्षणाचे धडे दिले.
स्वयंशासन राबविल्या नंतर डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुखदेव गौरकार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका लता पाटणकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्त्व आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याबाबत माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक शंकर राठोड, अजय बदखल यांनी केले. प्रास्ताविक श्रेया रावणहत्ते तर संचालन साक्षी बिनगुले हिने केले. सानिया शेख हिने आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.