सेतू बांधा रे ! अखेर तेजापूरवासियांनी करून दाखवलं….

डॉ. लोढा यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून पूल तयार

0

विवेक तोटेवार, वणी: डॉ. महेंद्र लोढा आगे बढो… डॉ साहेब जिंदाबाद… अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता… कुणी साखर वाटून आनंद व्यक्त करत होतं…. तर कुणी बँडच्या ठेक्यावर ताल धरत होते…. लोक फटाके फोडून आनंद व्यक्त करत होते… गावात चक्क दिवाळी नसतानाही दिवाळी साजरी केली गेली…. याचं कारणही तसंच होतं… गावक-यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती…. जे स्वप्न गावक-यांनी वर्षानुवर्ष बघितलं होतं. तो ”श्रमसेतू” अखेर पूर्ण झाला होता…. ही कहाणी आहे तेजापूर या गावाची, तिथल्या माणसांची, दिवसरात्र एक करून राबणा-या हातांची…

तेजापूर हे गाव वणी तालुक्याचं शेवटचं टोक… तालुक्यापासून सर्वात दूर अशी या गावाची ओळख… एका बाजूने यवतमाळ जिल्हा तर दुस-या बाजूने चंद्रपूर जिल्हा… गावाशेजारूनच वाहणारी पैनगंगा नदी… सोबतच गावाच्या वेशीवरून जाणारा एक नाला… जो दोन्ही जिल्ह्याला वेगळा करतो… गेल्या अनेक वर्षांपासून तेजापूरवासी या नाल्यापासून त्रस्त होते. हा नाला शेतीचा आणि पलिकडे असणा-या गावांची वाट रोखायचा. पावसाळा ते दिवाळी पर्यंत हा रस्ताच बंद राहायचा. गावात उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन शेती आहे. हा पूल ओलांडूनच शेतामध्ये शेतक-यांना जावे लागायचे. या नाल्यावर पूल बांधावा अशी अनेक अनेक वर्षांपासून गांवक-यांची मागणी होती. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून आणि तेजापूरवासियांच्या श्रमदानातून कोणतीही शासकीय मदत न घेता या नाल्यावर पूल तयार करण्यात आला. शनिवारी या पुलाचे उद्घाटन कऱण्यात आले. ”माणसांना जोडणा-या” या पुलाला श्रमसेतू हे नाव देण्यात आलं.

शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास सर्व गाव तेजापूरच्या या पुलाच्या उद्घाटनासाठी गोळा झालं होतं. डॉ. लोढा यांचा पुढाकार, श्रमदान आणि लोकवर्गणीतून यातून अख्खा पूलही तयार होऊ शकतो याचं परिसरातील गावातील लोकांनाही आश्चर्य वाटत होतं. त्यामुळे आजुबाजुच्या गावातल्या लोकांनीही हा पूल बघण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी डॉ. महेंद्र लोढा यांचे पुलाजवळ आगमन होताच लोकांनी त्यांच्या नावाच्या जयघोष करीत हारतुरे घालत त्यांचं स्वागत केलं. या पुलाचं डॉ. लोढा यांच्या हस्ते या ‘माणसांना जोडणा-या’ पुलाचं उद्घाटन कऱण्यात आलं. तिथून गावक-यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून फटाक्याच्या आतषबाजीत रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे दोन हजार लोक सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅली पुढे गेली. अखेर या रॅलीचा गावातील शाळेच्या पटांगणात शेवट झाला.

शाळेच्या पटांगणात गावक-यांनी छोटेखानी स्टेट तयार केला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास तिथे डॉ, लोढा यांचा नागरी सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजापूरचे सरपंच होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग पाटील गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, प्रा. मत्ते, सूर्यकांत खाडे, तेजापूरचे पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हे होते. यावेळी श्रमदान करणा-या व्यक्तींचा डॉ. लोढा यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सरपंच म्हणाले की आम्ही अनेक वर्षांपासून पुलाची मागणी केली होती. मात्र सत्ताधा-यांनी आमच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केलं. अखेर सत्तेत नसताना डॉ. लोढा यांनी जे कार्य करून दाखवलं त्याबद्दल आम्ही गावकरी कायम ऋणी राहील. राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा वसा त्यांनी जो घेतला आहे. त्यासाठी भविष्यात आम्ही त्यांच्या पाठीशी राहिल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी डॉ. लोढा म्हणाले की मी तर केवळ माणसांना जोडणारं एक साधन आहे. पुल बनवण्याचं संपूर्ण श्रेय माझं नाही तर हे श्रेय गावक-यांना जाते. गावकरी पाठीशी उभे राहिले. त्यांनी अत्यंत परिश्रम करून भर उन्हातान्हात श्रमदान केले. त्यामध्ये गावकरी युवकवर्ग महिला यांनी उत्सुर्त सहभाग घेतला त्यामुळे हे काम अवघ्या 96 तासांमध्ये पूर्ण होऊ शकले. पुढे ते म्हणाले की जवळपास साडे तीन करोड रुपयाचं बांधकाम सांगण्यात आलं होंत. मात्र केवळ मोजक्या पैशात हे बांधकाम पूर्ण कऱण्यात आलं. हे केवळ लोकसहभागामुळे आणि लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे शक्य होऊ शकलं. लोकांच्या श्रमातून हा पूल तयार झाला. लोकसहभाग आणि श्रमदानाची काय ताकद आहे ही इतरांनाही कळावी, त्यापासून इतर गावांनीही प्रेरणा मिळावी यासाठी या पुलाला श्रमसेतू हे नाव देण्यात आलं. यापुढे हा श्रमसेतू या पुलांवरून जो बाहेरगावातील व्यक्ती प्रवास करेल त्याला नक्कीच प्रेरणा देईल असेही ते म्हणाले.

सध्या डॉ. लोढा यांच्या पुढाकाराने अनेक गावांमध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून रस्ता आणि पुलाचे काम करण्यात आले आहे. ही बातमी तेजापूर गावातील काही तरुणांपर्यंत पोहोचली. त्यांनी डॉ. लोढा यांची भेट घेतली. संपूर्ण पावसाळा या नाल्यात पाणी असते. त्यामुळे शेतावर जाण्यासाठी तसेच चंद्रपूर, कोरपना या गावाला जाण्यासाठी संपर्क तुटतो. जर चंद्रपूरला जायचं ठरल्यास तब्बल 50 किमीचा फेरा पडतो. या पुलाचं शैक्षणिक, आरोग्य आणि इतर दळणवळणासाठी मोठं महत्त्व आहे. ही समस्या त्यांनी डॉ. लोढा यांना बोलून दाखवली. पुल बनवणे म्हणजे काही पांदण रस्ता बनवण्याइतकं सोप्प काम नव्हतं. डॉ. लोढा यांनी गावात एक बैठक घेतली. पुलाचं काम असल्याने नागपूरच्या एका सिव्हिल इंजिनियरला संपर्क करण्यात आला. पुढे या ठिकाणाची पाहणी झाली. लोकांनी काही शक्य असेल तेवढी वर्गणी काढायचे आणि श्रमदान करायचे ठरले. डॉ. लोढा यांनी गावक-यांना विश्वास दिला की पूल तयार होऊ शकतो. तसेच संपूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं.

गेल्या आठवड्यात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. परिसरातील जंगलातून मुरुम आणली गेली. लोकवर्गणीतून आणि गोळा झालेल्या रकमेतून पुलाला लागणारे साहित्य विकत घेतले गेले. नागपूरवरून मनिष चौधरी हे इंजिनियर आले. स्वतः सूर्य उगवला की लोकांचे पाय आपसूकच श्रमदानासाठी पुलाकडे वळायचे. महिला, तरुण यांच्यासोबतच वृद्ध देखील आपलं काम समजून पूल तयार करण्याच्या कामाला लागले. गावक-यांसोबतच इंजिनियरही संपूर्ण वेळ तिथे थांबायचे. अखेर अवघ्या 96 तासांमध्ये गावक-यांनी हा पूल तयार केला.

हा पूल खालच्या भागात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी जवळपास 35 ते 40 फुटांची खोल दरी आहे. पावसाळ्यानंतर जेव्हा नाला सुकायचा तेव्हा तिथून वाहतूक सुरू व्हायची. मात्र ही दरी इतकी धोकादायक आहे की जीव मुठीत घेऊनच बाईक या नाल्यामधून काढावी लागायची. गावातील नागरिक सांगायचे की केवळ गावातली व्यक्तीच हा नाला बाईकने पार करू शकतो. नवखी व्यक्ती जर या मार्गाने आली तर त्यांना बाईक काढायला चांगलीच कसरत करावी लागायची. अनेकदा इथे अपघातही झाले आहेत. या आधी या पुलाच्या कामासाठी अनेकदा गावक-यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवले. मात्र त्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं. पुलाचा कोट्यवधींचा बजेट असल्याचं सांगून पुलाच्या कामाला कायम टाळाटाळ केली गेली. मात्र अखेर श्रमदानातून आणि लोकसहभागातून अतिशय कमी खर्चात हा पुल इंजिनियरची तांत्रिक मदत घेऊन तयार करण्यात आला आहे.

चंद्रपूरचे अंतर होणार कमी
चंद्रपूरचं अंतर 50 किलोमीटरने कमी, भाविकांची गैरसोय थांबणार गावक-यांचा बाजारासाठी किंवा शिक्षणासाठी चंद्रपूरशी आणि कोरपन्याशी नेहमी संबंध येतो. चंद्रपूरला जाण्यासाठी गावक-यांना मोठा फेरा मारून जावे लागायचे. हा पुल तयार झाल्याने आता सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी झालं आहे. त्यामुळे वेळेसोबतच आता पैशाची देखील बचत होणार आहे. तसेच विदर्भा आणि पैनगंगा नदीचा जवळच संगम होतो. कार्तिक पौर्णिमेला तिथे जत्रा भरते. भाविक मोठ्या संख्या या जत्रेला हजेरी लावतात. मात्र नाल्यामुळे भाविकांना त्यांचे वाहने नाल्याआधी ठेवून पायी प्रवास करावा लागायचा. तर काही भाविक गैरसोयीमुळे तीस किलोमीटरचा फेरा मारून वेळाबाई मार्गे जत्रेला यायचे. हा पुल तयार झाल्याने आता भाविकांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.