प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तेली फैल येथील महिलांचे उपोषण मागे

काही अटी व शर्तीवर उपोषण मागे, सोमवारपासून उपचार सुरू

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल विरोधात वार्डातील महिलांनी उपोषण सुरू केले होते. अखेर तीन दिवसानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणी मध्यस्थी केली. उपोषणकर्त्या महिलांची समजूत काढल्यानंतर काही अटी आणि शर्तीवर हे उपोषण मागे घेण्यात आले. सोमवारपासून या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होणार आहे.

तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वणीतील तेली फैल येथील लोढा हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येत होते. दरम्यान या हॉस्पिटलमुळे परिसरात कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करत वार्डातील महिलांनी या हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी अशी मागणी करत 23 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते.

शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. दरम्यान दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे यांनी उपोषणकर्त्या महिलांची समजूत काढण्यासाठी भेट घेतली. त्यांनी महिलांना कोविड हॉस्पिटलची गरज महिलांना समजावून सांगितली व या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती स्थानिक प्रशासनाला केली. यावेळी प्रशासन आणि उपोषणकर्त्या महिलांमध्ये चांगली शाब्दिक खडाजंगी झाली.

या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी संध्याकाळी उशिरा महसूल भवन येथे हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा व उपोषणकर्त्या महिला यांच्यामध्ये मध्यस्थीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकरी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, आरोग्य विभागाचे अधिकारी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नगरसेवक प्रशांत निमकर यांच्यासह तेली फैल येथील महिला उपस्थित होत्या.

असा निघाला तोडगा…
उपविभागीय अधिकारी यांनी सेंटरमुळे कुणालाही कोरोना होणार नाही यांची संपूर्ण काळजी घेतली जाईल अशी ग्वाही तेली फैल येथील रहिवाशांना दिली. तर डॉ. महेंद्र लोढा यांनी तेली फैलातील कोणत्या नागरिकांना कोविडची लागण झाली तर शासकीय दराच्या अर्ध्या दरामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार केला जाईल, असे वचन दिले. अखेर रात्री 8 वाजताच्या दरम्यान महिलांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

सोमवारपासून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार
शुक्रवारी हॉस्पिटलचे इन्सेप्शन करण्यात आले. त्यांनी हॉस्पिटलला काही सूचना दिल्यात. या तांत्रिक बाबी पूर्ण करून सोमवारपासून या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहे. इथे केवळ कोविड रुग्णांवरच उपचार होणार. यात सामान्य पॉजिटिव्ह रुग्णांसह कोविड बाधित महिलांची प्रसूती, कोविड बाधित बाळांचा उपचार, कोविड बाधित रुग्णांचे ऑपरेशन यासह टेस्ट लॅब, आयसीयू, इत्यादी मल्टिस्पेशालिटी आरोग्य सेवा पुरवल्या जाणार आहे.

परिसरातील नागरिकांची काळजी घेणार- डॉ. महेंद्र लोढा
कोरोना महामारी हे केवळ आपल्या परिसरातीलच नाही तर एक वैश्विक संकट आहे. या विरोधात आपल्याला सर्वांनी मिळून लढा द्यायचा आहे. आता स्थानिक सोबत असल्याने ही लढाई आणखी सोपी झाली आहे. महिलांनी सामंजस्याची भूमिका घेत या प्रकरणी तोडगा काढला त्याबाबत त्यांचे खूप खूप आभार. या पुढे परिसरातील कोणत्याही गंभीर रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. कोविड रुग्णांना जी काही सर्वोत्तम सेवा देता येईल ती देण्याचा मी व माझी टीम प्रयत्न करेल.
– डॉ. महेंद्र लोढा, संचालक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आधी गंभीर रुग्ण उपचारासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा तसेच अदिलाबाद येथे धाव घेत होते. मात्र तिथेही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची चांगलीच परवड सुरू होती. आता स्थानिक ठिकाणीच मल्टिस्पेशालिटी सेवा मिळणार असल्याने कोविड रुग्णांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.