कोरोनाबाधित शहरातून येणा-यांमुळे वणीत टेन्शन

कोरोनाच्या भितीमुळे आता लोकांची वणी व परिसरातील खेड्यांकडे धाव

0

जब्बार चीनी, वणी: प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिनाभराच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाला वणीत एंट्री मिळाली नाही. परंतु, कोरोनाबाधित जिल्ह्यातून ये-जा करणारे वणीकारांचे टेन्शन वाढवत आहे. त्यातच नागपूर, यवतमाळसारख्या शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून तिथल्या काही लोकांनी वणी व परिसरातील काही खेड्यात येण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे. त्यातच काही अफवांची भर पडत असल्याने प्रशासनावरचा ताण अधिक वाढत असल्याचे दिसत आहे.

शहरात सध्या कोरोनाचा शिरकाव झाला नसला तरी कोरोनाबाधित शहरातून भाजीपाला, फळ, औषधी तसेच जीवनाश्यक वस्तू वणीत दाखल होत आहे. कोरोनाबाधित जिल्ह्यातून वाहनांच्या सहाय्याने या माल वणीत पोहोचवला जात आहे. या वाहनांचे चालक व वाहक हे कोरोनाच्या वाहनातील माल खाली होईपर्यंत इतरत्र फिरताना दिसतात. यांच्यापासून धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित शहरातून येणा-या वाहनांच्या चालक व वाहकावर नजर ठेवण्याची गरज आहे.

एमआयडीसी व ओमनगरमध्ये कोरोनाबाधित शहरातील व्यक्ती?
एमआयडीसीमध्ये नागपुरहून आलेल्या एका व्यक्तीची माहिती प्रशासनाला देण्यात आली. परंतु प्रशासनाचे कर्मचारी तिथे पोहोचताच त्याला लपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परवा एका नगरसेवकाने ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना फोन करून आपल्या वार्डात एक व्यक्ती नागपुरहून आल्याची माहिती देताच  अधिक्षकांनी माहिती देणा-यांनाच उलट प्रश्न विचारले व नागपूरहून आलेल्यांचा नंबर विचारू लागले. प्रशासनाला मदत करण्याच्या उद्देशाने माहिती दिली असता उलट आमचीच चौकशी केली याबाबत त्या नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली.

ओम नगर येथेही एक व्यक्ती यवतमाळहून आल्याची माहिती मिळत आहे. सध्या यवतमाळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. अद्याप वणीत कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र जर जर त्या ठिकाणावरून कुणी प्रशासनाला माहिती न देता वणीमध्ये दाखल होत असेल तर ही घटना गंभीर आहे. अशा घटनांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

वणीत आली पिंपरी चिंचवड पासिंगची गाडी…
गेल्या तीन दिवसात वणीमध्ये दोन मोठ्या अफवा पसरल्या. त्यातील एक मनिष नगर येथील होती. एक कुटुंब पुण्यावरून वणीतील मनिषनगर येथे दाखल झाल्याचे पसरले. त्यावरून परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ते कुटुंब पिंपरी चिंचवड येथील पासिंगच्या गाडीने आल्याने अफवेला आणखीनच ऊत आला. मात्र त्या लॉकडाऊन आधीच तालुक्यातील एका गावात दाखल झाल्या असून त्यांचा होम कॉरेन्टाईनचा काळही संपला असल्याचे कागदपत्र त्यांनी सादर केले. वणीतील एका नातेवाईकची तब्येत बघण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्या गाडीने ते पिंपरी चिंचवडहून आल्याची अफवा पसरली होती. ती गाडी तिथून विकत घेतली असून त्याची पासिंग यवतमाळ जिल्ह्यातीलच असल्याचे स्पष्ट झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

दुसरी अफवा साईनगरीतील
साई नगरीतील एका दाम्पत्याला ऍम्बुलन्स येऊन उचलून घेऊन गेल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र सध्या अनेक वॉट्स ऍप गृपची पोस्ट पब्लिशची सेटिंग ऍडमिन ओन्ली असल्याने ही अफवा जास्त पसरली नाही. मात्र काही लोकांनी पर्सनल मॅसेज करून ही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. या बाबत आम्ही फॅक्ट चेक केले असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे आम्हाला कळले.

वणी कोरोनापासून दूर राहावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. कोरोनाबाधित शहरातून लपून छपून काही व्यक्ती वणी व परिसरात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे करणा-यांवर गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या वाहनाचे चालक व वाहक जर शहरात इतरत्र फिरताना दिसून आले तर त्यांच्यासह ज्यांच्याकडे ते माल घेऊन आले, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.