तेरवीच्या कार्यक्रमाला तिलांजली, वाचनालयाला केली मदत

नानाजी मोहुर्ले यांनी पाडला नवा पायंडा

0

बहुगुणी डेस्क, वणी: मनुष्य रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फे-यात अडकलेला आहे. जन्मभरतर तो यात अडकलेला असतो मात्र त्याच्या मृत्यूनंतरही फेरा काही सुटत नाही. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या परंपरा अजुनही सुरुच आहेत. मात्र वणीतील एका कुटुंबाने मात्र तेरवीच्या खर्चाला फाटा देऊन ती रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करून एक नवा पायंडा पाडला आहे.

नानाजी रामाजी मोहुर्ले हे विठ्ठलवाडी येथील रहिवाशी आहे. त्यांच्या आई जानकाबाई रामाजी मोहुर्ले यांचं 30 सप्टेंबरला वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 95 वर्षांच्या होत्या. नेहमीच सामाजिक कार्यात अर्ग्रेसर असलेल्या नानाजी यांनी तेरवीच्या कार्यक्रमाला होणा-या खर्चाला फाटा देण्याचं ठरवलं.

त्यांच्या घरासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय आहे. तिथे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्यासाठी व पुस्तके वाचण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र तिथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची कमतरता होती. त्यामुळे नानाजी यांनी तेरवीच्या खर्चाला फाटा देऊन त्या खर्चामध्ये खुर्च्या विकत घेतल्या व त्या वाचनालयाला भेट दिल्या.

सोमवारी संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्तीथ नानाजी मोहूर्ले, गणेश मोहूर्ले, वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब राजूरकर, सचिव प्रा. विजय बोबडे, प्रा. अनिल टोंगे, अँड अमोल टोंगे, संजय चिंचोलकर, विकास देवतळे, उमेश रासेकर, अमीत लिचोडे, मंगेश रासेकर यांच्यासह विद्यार्थी व मित्र परिवार उपस्थित होता.

“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहीजे” ही उक्ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम नानाजी मोहुर्ले यांनी केलं आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरणादाई ठरणारं आहे. त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.