ठाणेदारांची तात्काळ बदली करा, बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात ठाणेदार अयशस्वी ठरल्याचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात सातत्याने सुरू असलेले घरफोडीचे सत्र तसेच दुचाकी चोरी, अवैध धंद्यात झालेली वाढ यामुळे वणीकर दहशतीत आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेत तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या समर्थकांतर्फे निवेदन देण्यात आले. यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यासह वणी-करंजी मार्गावरील टोलनाका बंद करण्याची मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.

बुधवारी दिनांक 12 तारखेच्या पहाटेच्या सुमारास वणीतील पत्रकार आसिफ शेख यांच्या घरी चोरी करत चोरट्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याचे तीव्र पडसाद वणीत उमटले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात ठाणेदार अपयशी ठरले आहे. असा आरोप करत निवेदनात ठाणेदारांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.

वणी-करंजी मार्गावरील टोल हटवण्याची मागणी
घुग्गुस-वणी-करंजी या राज्यमहामार्गावर IVRCL या कंपनीमार्फत टोल वसुली सुरू आहे. सदर कंपनी जनहिताच्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच सदर कंपनीला वारंवार कामात सुधारणा करण्यासाठी सूचना पत्र देण्यात आले आहे. मात्र त्याकडे कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. हा टोल तात्काळ हटवावा अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी मनिष सुरावार, किशोर नांदेकर, राजू तुराणकर, टिकाराम खाडे, ललित लांजेवार, सुधाकर गोरे, प्रेमनाथ ढवळे, देवेंद्र दोडेवार यांची उपस्थिती होती. या निवेदनाची प्रत पालकमंत्री संजय राठोड यांना देखील पाठवण्यात आली आहे. आता सत्ताधा-यांनीच शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: 

वणीतील शुभम खोकले यांना MBA मध्ये सुवर्णपदक

हिंदू मुलीला दत्तक घेऊन कन्यादान करणारे सत्तारमामू फुलवाले यांचे निधन

शोएब खानचे मैदानावर तांडव… षटकारांची बरसात करत नाबाद 63 धावा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.