गेला रेती तस्कर कुणीकडे? पाच दिवसानंतरही तस्कर फरारच….

आरोपीला जामीन मिळण्यासाठी पोलिसांचा घाट ?

0

वणी बहुगुणी डेस्क: वणी महसूल विभागातील गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन पाच दिवस झाले. मात्र या फरार आरोपीला अटक करण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. उलट आरोपीने आज पांढरकवडा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे वणी पोलिसांनी आरोपीला जामीन मिळण्यासाठी तर जाणून बुजून 5 दिवस अटक केलेली नाही, याची जोरदार चर्चा आहे.

लॉकडाउनच्या काळात वणी उप विभागात रेती तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडले असता 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान गणेशपूर मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी छोरिया ले आऊट मध्ये रंगनाथ रेसिडेन्सीच्या मागे विना परवाना रेती भरलेला एक ट्रक पकडला होता. मात्र रेती तस्कर उमेश पोद्दार यांनी दोघांना न जुमानता देशपांडे व सिडाम यांना धक्काबुक्की करून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन रेती भरलेला ट्रक जबरीने खाली करून घेतला. एवढेच नव्हे तर ट्रक चालकांनी महसूल अधिकाऱ्यांना कट मारून ट्रक पळवून नेले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्देशानुसार मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी त्याच रात्री वणी पोलीस स्टेशनमध्ये रेती तस्कर उमेश पोद्दार (38) विरुद्द दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 353, 506, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केले. गुन्हा दाखल होताच आरोपी उमेश पोद्दार फरार झाला होता. तर पोलिसांनी ट्रक क्र. MH34 M 3681 जप्त करून ट्रक चालकास अटक केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रेती तस्कराला राजकारण्यांचे पाठबळ ?
आरोपी उमेश पोद्दारला वणीतील काही राजकारणी व धनदांडग्यासह महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असून पोलिसांवर आरोपीला अटक न करण्याचा दबाव असल्याची माहिती आहे. आरोपी हा वणीतच वावरत असताना तसेच सोशल मीडियात ऑनलाईन दिसत असताना पोलिसांनी आरोपी फरार असल्याचा बनाव केला. या बाबत तपास अधिकारी सपोनि माया चाटसे यांनी आरोपी तेलंगणात असल्याची माहिती प्रसार माध्यमाना दिली होती. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांवर हल्ला होऊनसुद्दा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. उलट वरिष्ठांनी पीडित मंडळ अधिकारी व तलाठी यांनाच दोन शब्द सुनावले असल्याची चर्चा आहे.

संग्रहित फोटो

 

तहसीलदारांची भूमिका बघ्याची
वणी तालुक्यात भरदिवसा होत असलेली रेतीची तस्करी व घडलेल्या प्रकरणात वणी तहसीलदाराची भूमिका बघ्याची असल्याचे चित्र दिसून आले. रेती भरलेलं ट्रक पकडल्यानंतर तस्कर उमेश पोद्दार यांनी मंडळ अधिकारी देशपांडे यांना तुम्ही तहसीलदाराला फोन लावा, ते तुम्हाला रेती सोडण्याचा आदेश देतील असे सांगितले होते. मात्र मंडळ अधिकारी देशपांडे यांनी तहसीलदार यांना माहिती न देता सरळ उपविभागीय अधिकारी यांना फोन लावून घटनेची माहिती दिली. त्यामुळे तहसीलदार शाम धनमने तलाठी सिडाम वर चिडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.