विवेक तोटेवार, वणी: सोमवारी पळसोनी फाट्यावर झालेल्या अपघातात सीताराम बापूराव बेलेकर यांचा मृत्यू झाला. गावातील नदीकाठी अंत्यविधी करताना अचानक नदीला पूर आल्याने सीताराम यांचे पार्थिव सरनासह वाहून गेले होते. मात्र अखेर गावकऱ्यांनी मंगळवारी दुपारी त्यांचे पार्थिव शोधून काढले व त्यांच्यावर त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास सीताराम यांच्या दुचाकीला क्रूझर वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत सीताराम गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन व पोलीस कारवाई पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याकरिता गावात आणल्या गेले.
गावात स्मशानभूमी नसल्याने गावातील नदीतीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू झाला. याच वेळी नदीला पूर आल्याने त्यांचे पार्थिव सरणासाहित वाहून गेले. सोमवार सायंकाळपासून त्यांचा शोधाशोध सुरू होता. मंगळवारी सायंकाळी 4 वाजता वणीतील लालपुलिया येथील नाला व नदी ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी सीताराम यांचे पार्थिव आढळले. गावातील काही तरुणांनी त्यांना काढून त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.