पाण्यावरून न.प. सभापती व कंत्राटदार वाद विकोपाला
सभापतींची कंत्राटदाराविरोधात जिल्हाधिकारींकडे तक्रार
जब्बार चीनी, वणी: नगर पालिकेचे जलपुर्ती सभापती नितीन चहानकर यांनी त्यांच्या विभागाच्या कंत्राटदाराची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याने सभापती विरूद्ध ठेकेदार हा वाद विकोपाला जाईल असे दिसत आहे. विशेष म्हणजे या अगोदर दोन-तीन वेळा जलपुर्ती सभापतींनी नगर पालिका मुख्याधिका-यांकडेही यासंबंधी तक्रारी केल्या आहेत. सत्तेत असून सभापतींनाच कंत्राटदाराविरोधात तक्रार करावी लागल्याने याची चांगलीच चर्चा शहरात रंगली होती.
चहानकर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की दि 20 मे 2020 रोजी पाणीपुरवठा कंत्राटदार यांनी नगर परिषद प्रशासन, सभापती, न. प. सदस्य यांना दिलेल्या माहिती नुसार ते आपले पाणीपुरवठाचे काम बंद करत आहे. कंत्राटदारांने रांगणा भुरकी प्लांटचे काम माझ्याकडे नाही व सभापती व सदस्य विनाकारण गैरसमज करून नाराज आहे. त्यामुळे मी हे काम थांबवत आहे.
कामाचा करार करताना कंत्राटदारांनी पाणी पुरवठाचे सर्व कार्य हे अत्यावश्यक सेवेत मोडते. हे कार्य सार्वजनिक हिताचे असल्यामुळे कंत्राटदाराला नगर परिषदला सबळ कारणासह पूर्वसूचना न देता कार्य बंद करता येत नाही असे करारनामात कंत्राटदाराने अटी व शर्ती मध्ये लिहून दिले आहे. सदर कत्राट हे 30 जून 2020 पर्यंत संपुष्टात येत आहे म्हणून पालिकेला धमकी देण्याचा हा प्रकार आहे. तसेच कंत्राटदार नियमाचे विरुद्ध काम करीत आहेत. असा आरोप तक्रारीत चहानकर यांनी केला आहे. तसेच नगर परिषद सदस्य व सभापती यांनी वारंवार तक्रारी दिलेल्या आहे परंतु प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. असेही यात म्हटले आहे.
असे कोणतेही पत्र मिळाले नाही – संदीप बोरकर, मुख्याधिकारी
कंत्राटदार संभा वाघमारे यांनी काम बंद करणार असल्याचा इशारा दिल्याने चहानकर यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. मात्र मुळात संभा वाघमारे यांनी काम बंद करण्याबाबत कोणतेही अधिकृत पत्र न दिल्याचा खुलासा मुख्याधिकारी यांनी केला आहे. ते म्हणाले की रांगणा भुरकी प्लांट देखभाल व दुरस्तीचे काम सुरू असुन नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी नाही. विद्युत पुरवठा वेळी अवेळी खंडीत होत असल्याने त्याचा परीणाम जलपूर्ति वर होत आहे.
सत्तेत असून तक्रार करण्याची वेळ का?
सत्तेत असून देखील कामे होत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचं नगरसेवकांनी अनेकदा खासगीत म्हटलं आहे. वणी नगरपालिकेत भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षांचा कालावधी झाला. या तीन वर्षांच्या कालावधीत भाजपाविरोधात प्रशासनामध्ये अनेक वेळा वाद झाले आहेत.
या संपूर्ण कालावधीत शहरात अनेक कामांना घेऊन नगरसेवकांमध्येही वाद झालेत. तर अनेक कामाबाबत प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार या नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या तक्रारींची दखल कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एक हाती सत्ता असतांना नगराध्यक्षांचे निकटवर्तीय सभापतींना एका कंत्राटदारांची तक्रार थेट जिल्हाधिका-यांना करावी लागते याचा काय अर्थ लावावा? नगराध्यक्षांना नगरसेवक जुमानत नाही की अन्य काही….