चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक शिरला चक्क हॉटेलमध्ये

चारगाव चौकी येथील घटना, जीवितहानी नाही पण हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान

0

जितेंद्र कोठारी, वणी: चारगाव चौकी येथे असणा-या एका हॉटेलमध्ये ट्रक घुसला. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात हॉटेलचे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी दिनांक 7 जुलै रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदोला जवळ पैनगंगा ही कोळशाची खाण आहे. या खाणीतून काढलेल्या कोळशाची वाहतूक करण्याचा परवाना पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनी (पीटीसी) या कंपनीला मिळाला आहे. बुधवारी रात्री ट्रकचालक किशोर पिंपळकर हा पीटीसी कंपनीचा ट्रक (MH40 CD 2180) घेऊन पैनगंगा खाणीत चालला होता. 8.30 वाजताच्या सुमारास हा ट्रक चारगाव चौकीजवळ पोहोचला. सदर ट्रक भरधाव असल्याने चौकीवर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून ट्रक जातात ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

चारगाव चौकीवरच घुग्गुस व कोरपना (शिंदोला) मार्गाच्या कॉर्नरवर आझाद नावाचे हॉटेल आहे. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात चालकाला कोणतीही इजा झाली नसली तरी यात हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे 10 लाखांपर्यंत असल्याचा दावा हॉटेल मालकाचा आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.