निबंधक कार्यालयाची ‘लिंक फेल’, नागरिकांची प्रचंड गैरसोय
बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेचा फटका नागरिकांना
जब्बार चीनी, वणी: बीएसएनएलची लीज लाईन नादुरुस्त असल्याने गेल्या आठ दहा दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासंतास वाट पाहावी लागत आहे. सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी आनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणकप्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे 506 दुय्यम निबंधक कार्यालये असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते.
वेळेवर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार न झाल्यामुळे अनेकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. कोणाला दवाखान्यासाठी, कोणाला लग्नासाठी, तर कोणाला अन्य कारणांसाठी पैशांची निकट असते. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी वेळेचे फार मोठे महत्त्व असते. परंतू खरेदी – विक्री व्यवहार करण्यासाठी लागणारे दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे दस्त करण्यास असमर्थता दाखवीत आहे.
रिअल इस्टेट एजंट्सतर्फे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
शहरात रोज सरासरी 18 ते 20 दस्तांची नोंदणी होते. नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुस-या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे 21 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणा-या नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
याविषयी असोसिएशन आफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार पाठवून बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांना बसत असून शासनाचा महसूल बुडत आहे तरी नोंदणी विभागातील या समस्येवर आवश्यक ती कार्यवाही करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
लिंकबाबत वरपर्यंत तक्रार – रनमले
बीएसएनएलची लीज लाईन नादुरस्त असल्याने आम्ही हतबल आहो. दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हर डाऊनची समस्या नाही. बीएसएनएलची लिंकच नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुस-या दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील दहा दिवसांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. याविषयी वारंवार तक्रारी बीएसएनएल व राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल.
– जी.टी. रनमले, दुय्यम निरीक्षक वणी
या गंभीर प्रश्नाकडे ना जिल्हाधिका-यांचे लक्ष आहे ना महसुलातील इतर अधिकायांचे. त्यामुळे यासंबंधी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे.