जब्बार चीनी, वणी: ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले…. आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला… आईचे स्वप्न केवळ एकच की आपल्या मुलीने खूप खूप शिकावं…. तिची आजीनेही वयाच्या 72 व्या वर्षी मोलमजुरी करून घर चालवायला व नातीच्या शिक्षणासाठी हातभार लावला… ही कहाणी आहे नंदिणी अनिल नैताम या होतकरू कुमारीकेची… ती पांढरकवडा येथील राजश्री शाहू विद्यालय व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी असून ती नुकतीच 12 वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम आली आहे…
पांढरकवडा येथील इंदिरा आवास योजना अंतर्गत मिळालेल्या एका छोट्याश्या झोपडीवजा घरामध्ये नंदिणी ही तिची आई वर्षा नैताव व तिची आजी सुभद्रासह राहते. ती दुस-या वर्गात असतानाच तिचे वडील वारले. ते ड्रायव्हर होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्या आई व आजीच्या अंगावर आली. नंदिणी अभ्यासात लहाणपणापासून अतिशय हुषार होती. तिने प्राथमिक शिक्षण पांढरकवडा येथील नगर परिषद घरकूल शाळेत घेतले.
ती सातव्या वर्गात असताना तिला चंद्रकांत पेटेवार हे वर्गशिक्षक होते. त्यांना नंदिणीच्या अभ्यासातील चुणून लक्षात आली. त्यांनी सातवीनंतर तिची ऍडमिशन राजश्री शाहु विद्यालयात करून दिली. तसेच घरकूल शाळेतील शिक्षकांनी स्वत: पैसे गोळा करून नंदिणीला एक सायकल घेऊन दिली. त्यानंतर तिने कधीही मागे फिरून बघितले नाही. घरकूल शाळेतील शिक्षक व राजश्री शाळेतील शिक्षकांनी तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली.
वर्ग 10 वी मध्ये असताना नंदिणीने 92.40% गुण मिळवीत अनुसुचित जमातीमध्ये तालुक्यातून प्रथम आली होती. तर यावर्षी 12 वी मध्ये तीने (विज्ञान शाखेत) 85.00% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशाचे श्रेय तिची आई, आजी तसेच राजर्षी शाहू विद्यालयाचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देते. विशेष म्हणजे तिच्याकडून शिक्षकांनी शिकवणीचे कोणतीही फिस घेतली नाही.
आयएएस व्हायचे आहे – नंदिणी
माझ्या आईची मी शिकून कलेक्टर व्हावं अशी इच्छा आहे. त्यामुळे जरी मी विज्ञान शाखेत शिकली असली, तरी पुढचे शिक्षण मी कला शाखेत करायचे ठरवले आहे. पांढरकवड्यात शिकायचे की बाहेर शिकायचे हे अद्याप ठरवले नसले तरी इंग्रजी साहित्यात बीए करून सोबतच यूपीएससी व एमपीएससीची तयारी मी आतापासून करणार आहे. जर शिकण्याची जिद्द असेल व परिश्रम घेण्याची तयारी असेल तर त्यात येणा-या अडचणीवर सहज मात करता येते. आज मला जे य़श मिळाले आहे ते केवळ माझ्या आई, आजी आणि शिक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आहे.
– नंदिणी अनिल नैताम