जितेंद्र कोठारी, वणी: लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील कधीच न विसरणारा आनंदाचा क्षण. आपला लग्न कुटुंबीय, नातेवाईक आणि इष्टमित्रांच्या उपस्थितीत धूम धडाक्यात व्हावे अशी सर्वांची मनापासून इच्छा असते. मात्र कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे यंदा अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहिली. अनेकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली तर काही जणांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोपस्कार पार पाडले.
वणी तालुक्यातील भालर वसाहतीतील रहिवासी राजू रवींद्र डोंगे यांचा साखरपुडा चुनाडा (राजुरा) येथील कु. धनश्री प्रभाकर निमकर सोबत 3 जानेवारी 2020 रोजी संपन्न झाला. डोंगे व निमकर कुटुंबीयांनी दोघांचे लग्न नोंदणीकृत पद्धतीने करून रिसेप्शन देण्याचे ठरविले. मात्र राज्यात 18 मार्च 2020 पासून लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयसुद्दा बंद करण्यात आले.
लॉकडाउन कालावधी वाढत असल्याने अखेर राजू डोंगे यांनी प्रशासन कडून परवानगी घेऊन तसेच ई-पास काढून दि. 12 मे रोजी एका वाहनात आपल्या आई व भाऊ सोबत उपवधूचे घरी चुनाडा ता. राजुरा जि. चंद्रपूर येथे पोहचले. तिथे त्यांचे काही नातेवाईक व मुलीकडील 10 पाहुणे असे एकूण 20 जणांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वा. दरम्यान अत्यंत साध्या पद्धतीने व लॉकडाउन नियमांचे पालन करून लग्नसोहळा संपन्न झाला. या वेळी वधू-वरांनी तोंडाला मास्क बांधून एकमेकाला वरमाला घातली.
लग्नानंतर सामाजिक दुरी ठेऊन पाहूणेमंडलीचे जेवण आटोपून दुपारी डोंगे कुटुंबीय नवरीला घेऊन परत वणी तालुक्यातील भालर टाउनशिप पोहचले. डोंगे व निमकर कुटूंबियांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राजू डोंगे हे झरी तालुक्यातील मार्की मांगली कोळसा खाणीत माइनिंग सरदार या पदावर कार्यरत आहे तर वधू धनश्री D.ed, B.Com उच्च शिक्षित आहे.