विवेक तोटेवार, वणी: शहरातील एक भागात राहून शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी हरविल्याची तक्रार दोन महिन्याआधी वणी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. त्या मुलीला प्रेमाच्या पाशात अडकवून तिची विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसानी तिघांना अटक केली आहे.
पीडिता ही अल्पवयीन असून ती वणीत आपल्या आजोबासोबत राहायची. तिची आई ही केळापूर तालुक्यातील एका गावात राहायची. 25 जानेवारीला मुलगी आपल्या आईच्या गावाला जात असल्याचे सांगून वणीतून निघून गेली. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. मुलगी न पोहचल्याने तिच्या आईने 30 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाणे गाठून मुलगी हरीविल्याची दिली.
तब्बल तीन महिन्यानंतर तक्रार
मुलगी घरी न पोहोचल्याने तिच्या आईसोबतच तिचे आजोबाही चिंतेत होते. मात्र दरम्यानच्या काळात ती मुलगी आपल्या आईसोबत फोनवर बोलायची. घरी का पोहोचली नाही तर याबाबत ती लॉकडाऊनमध्ये अडकल्याचे कारण द्यायची. मात्र कुठे आहे याबाबत ती माहिती देत नव्हती. लॉकडाऊन संपताच घरी पोहोचणार असल्याचेही तिने सांगितले होते. मात्र अखेर ती घरी न परतल्याने तब्बल तीन महिन्यानंतर मुलीच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
तक्रार येताच वणी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक निखिल फटींग व एपीआय माया चाटसे प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान राजस्थानातील एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला या धक्कादायक प्रकरणाचा छडा लागला.
मुलीला प्रेमाच्या पाशात अडकवून विक्री
त्यांनी माहिती काढली असता त्यांना मुलगी हिंगणघाट येथे गेली असल्याचे आढळले. तिथे तिचे सूत प्रदीप उर्फ राहुल वाकडे (36) रा. हिंगणघाट यांच्यासोबत जुळले. पण मुळात ते प्रेम नव्हतेच. प्रदीपने त्याची आई सरस्वती आनंदराव वाकडे (55) सोबत एक वेगळाच कट रचला होता. मुलीला प्रेमाच्या पाशात अडकवून त्यांनी मुलीची 4 लाख रुपयात विक्री केली व तिचे लग्न दिनेश मूलचंद शर्मा (29) रा. भिलवाडा (राजस्थान) यांच्याशी लावून दिले.
लग्नानंतर पीडिता ही त्याच्यासोबतच राहत होती. ती 23 जून रोजी आपल्या पतीसोबत वणीला आली. वणी पोलिसात ठाण्यात तिच्या आईने तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी विरुद्ध कलम 363, 370, 376 (2) (y) (N), व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वणी पोलिसांनी तक्रार मिळताच तात्काळ सूत्र हलवीत हिंगणघाट तेथून प्रदीप व स्वरस्वती यांना अटक करून वणीला आणले. अखेर 5 महिण्यापासून आपल्या घरापासून व आपल्या आई पासून दूर असलेल्या पीडितेला तिच्या आईच्या सुपूर्द करण्यात आले.
तिन्ही आरोपींना 24 जून बुधवारी रोजी वणीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल फिटिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे, नापोका अविनाश बनकर, पो. शिपाई अमोल नूनेलवार करण्यात आली.