बसस्थानकावरून पैसे चोरणारे चोरटे अवघ्या दीड तासात जेरबंद

शेतक-याच्या शेतमालाचे 32 हजार केले होते लंपास

0

विवेक तोटेवार, वणी: एखादी वस्तू किंवा पैसे चोरीला गेले की ते विसरावेच लागते. कारण अशा वस्तू परत मिळणे याची खात्री कमीच असते. त्यात चोरी गेलेले जर पैसे असेल तर ते परत मिळण्याची शक्यता म्हणजे कपिलाषष्टी योगच. अनेक लोक पैसे चोरीला गेले की विसरून जा असा सल्लाही देतात. मात्र एका शेतक-याचे चोरी गेलेले पैशाचा पोलिसांनी केवळ दीड तासांच्या आत छडा लावला. सकाळी दहा वाजता त्या शेतक-यांने पैसे चोरी गेल्याचे तक्रार केली होती. म्हणजे आरोपी सकाळी नाष्टा करताना तक्रार झाली तर आरोपीवर दुपारचे जेवण करण्याच्या आतच जेलची हवा खाण्याची वेळ आली, असेच म्हणावे लागेल.

प्रशील नामदेवराव पोटे (30) रा. मुर्धोनी हा शेतकरी आहे. दिनांक 4 जूनला त्यांने वणीत सोयाबीन व तूर विकण्यासाठी आणला होता. माल विकल्यावर सायंकाळी तो आपल्या गावी परत जाण्यासाठी बसस्थानकावर आला. मात्र बस येण्यास उशिर होता. त्यामुळे त्याला तिथेच झोप लागली. यावेळी प्रशील जवळ 32 हजार रुपये होते.

दरम्यान प्रशील झोपल्याचे तिथल्या दोन चोरट्यांनी हेरले होते. ते लगेच डाव साधत प्रशीलच्या जवळ गेले व खिशातून पैसे लंपास करत तिथून पसार झाले. काही वेळाने प्रशिलला जाग आली. तेव्हा त्याने खिसा तपासला असता त्याला खिशातून पैसे चोरी गेल्याचे कळले. चोरट्याने डाव साधल्याचे लक्षात आल्याने व चोरीला गेलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याने अखेर निराश होऊन तो त्याच्या गावी परत आला.

पैसे चोरीला गेल्याने प्रशील दु:खी होता. मात्र गावातील मित्रांनी प्रशीलला पोलिसांत तक्रार करायचा सल्ला दिला. तसेही पैसे गेलेच आहे. तक्रार करून मिळाले तर मिळाले असे समजून त्याने आज सोमवारी 8 जून रोजी सकाळी याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला.

अवघ्या दोन तासात प्रकरणाचा छडा
गुन्हा दाखल होताच डीबी पथकाने आपल्या खबरींकडे विचारणा केली. त्यात त्यांना दोन चोरट्यांनी बसस्टॅन्डवर हात साफ केल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच सूत्रे हलवली व अवघ्या दीड तासांच्या आत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. महेश बबन गायकवाड (32) रा. दामले फैल व नंदकिशोर अनिल काळे (24) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून 32 हजार पैकी 28 हजार रुपये आढळून आले. अवघ्या दीड तासाच्या आत पोलिसांनी आरोपीचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.  सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, सुदर्शन वनोळे यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.