जब्बार चीनी, वणी: ‘एव्हरी रास्कल इज नॉट अ थीफ, बट एव्हरी थीफ इज ए रास्कल,’ म्हणजेच प्रत्येक बदमाश हा चोर नसतो पण प्रत्येक चोर हा बदमाश असतोच. असं जगप्रसिद्ध तत्वज्ञानी अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. बदमाश जरी स्वतःला खूप हुशार समजत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो तेवढा नसतोच. एक दिवस त्याला त्याचा हिशेब येथेच भरावा लागतो. ‘भाईगिरी’च्या नादी लागून स्वत:चं आयुष्य बरबाद करणा-या तरुणांकडे पाहिलं की हे प्रकर्षाने जाणवतं. कोणीही सराईत एका रात्रीत ‘भाई’ होत नसतो. तर त्याची प्रक्रिया सलग काही दिवस किंवा वर्षे सुरू असते. भाई होण्याच्या वेडापायीच तो स्वतःतर उद्ध्वस्त होतो. त्यासोबत त्याच्या नादाला लागणारे आणि त्याला मदत करणारे व त्याची पाठराखण करणा-यांच्या वाटेलाही तेच येतं. त्यामुळे हे वेळीच रोखणं गरजेचं आहे.
एके काळी खास मित्र असलेल्या दोन व्यावसायिकांच्या गटाने 28 मे ला मोमीनपुरा येथे मध्यरात्री आपसात राडा केला. लाठ्याकाठ्यांच्या साहाय्याने एकमेकाना मारहाण केली. यात पाच जण जखमी झाले होते व पोलिसांनी दोन्ही गटाच्या 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवले. त्यातील 14 आरोपींना तात्काळ अटक केली. यात इजहार शेख, जमीर उर्फ जम्मू खान, बबलू अहमद शेख, बाबूलाल उर्फ सय्यद आरीफ सय्यद शौकत, शहबाज शब्बीर चिनी, अक्रम खान सलीम खान, एजाज अली ताहेर अली, अब्दुल मकबूल अब्दुल रज्जाक, अब्दुल हाफीज उर्फ टापू अब्दुल सत्तार, राजू अडकीने, मो. वसिम मो.जाबीर, हैदर खान वहीद खान, सय्यद तौसीफ सय्यद अब्दुल, खुर्शिद हुसेन आबिद हुसेन यांचा समावेश होता.
आज पुन्हा पाच आरोपींना अटक
घटनेच्या दुस-या दिवशी 29 मेला पुन्हा एक आरोपी व 1 जूनला शाकीब अहेमद इकबाल खान, असलम खान अब्बास खान, शेख ताहीर शेख रफीक, शेख फारूक शेख सलीम व शेख समीर शेख रफीक असा पाच आरोपींना तर 3 जून म्हणजे आज आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आली. आता पर्यंत 25 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे व सर्वाना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यातील 90 टक्के आरोपींचे वय 20 ते 30 च्या घरात आहे. वयाचे आकडे पाहल्यानंतर या गंभीर गुन्ह्यात एकदा आरोपी म्हणून शिक्का बसल्यानंतर या मुलांचं पुढे काय होईल याचा विचार करण्याची वेळ आहे. साधारणत: वय वर्ष 25 पर्यंतचा काळ आपण उमेदीचा मानतो. ज्यामध्ये शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करणं, स्वत:चा व्यवसाय करणं, नवनवीन गोष्टी शिकणं, इत्यादी गोष्टी येतात. मात्र, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर जर एखाद्याचं नाव जर ‘क्रिमिनल रेकॉर्ड’मध्ये जात असेल, तर पुढे त्याचे परिणाम पुढे होणार याचा अंदाज आपण सर्वच लावू शकतो.
18 वर्षांवरील सर्व गुन्हेगारांसाठीचे कायदे वेगळे आहेत. त्यांची रवानगी थेट कारागृहात होते आणि त्यांना ती शिक्षा भोगावीच लागते. असे असतानाही गुन्हे घडण्याचे प्रमाण दोन्ही विभागात कमी झालेले नाही आणि एकूणच तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. हे कशामुळे घडतं, असा विचार करताना लक्षात घ्यावी लागते, ती आजच्या तरुणाईची मानसिकता आहे. यामध्ये अनेक मुद्दे आहेत.
स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आकर्षण, मित्रांची संगत, आर्थिक विवंचना, गुन्हेगारी विश्वाचं आकर्षण, भाई होण्याची हौस, ऐकून घेण्याच्या क्षमतेचा अभाव, सिनेमातील बघितलेलं गुन्हेगारीचं उदात्तीकरणं इत्यादी गोष्टींचा मनावर होणारा परिणाम असे अनेक मुद्दे मांडता येतील. मात्र यामुळे वाताहत होते, ती त्या आरोपीच्या कुटुंबाची! यासाठी ती भावना वेळीच रोखणं गरजेचं आहे.
तरुणांचे आयुष्य बनले रिमोट कन्ट्रोल?
टोळ्यांचे वर्चस्व, किंबहुना परिसरातील दहशत कायम ठेवण्यासाठी ‘भाई’कडून तरुण पोरांचा रिमोट कंट्रोलप्रमाणे वापर सुरू झाला आहे. मनसोक्त खा, पाहिजे ती प्या… खर्चाला चायपाणी घ्या पण टोळीची दहशत निर्माण करा, असा हुकूमच त्यांच्या माथी मारला जातोय. अल्लड वयात या गोष्टी चांगल्या वाटतात मात्र हा प्रकार भविष्यात फारच घातक ठरू शकतो. 28 तारखेचा शहरातील तो राडा म्हणजेच परिसरातील टोळ्यांच्या म्होरक्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू झाली असे म्हणता येईल.
तारुण्यातील एक चूकही पडू शकते महागात – वैभव जाधव
साधारणत: विशी नंतरचा काळ हा महत्त्वाचा असतो. हे वय सज्ञान असतं आणि हा काळच उमेदीचा असतो. या काळात जर एखादी चूक झाली तर त्याचा परिणाम त्याच्या पुढील आयुष्यावर पडत असतो. या काळात मुलाचं कोणी तरी ऐकून घेण्याची गरज आहे. केवळ महागडे कपडे, खाण्यापिण्याची चंगळ, महागडे मोबाइल घेऊन देणं, म्हणजे संगोपन होत नाही हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. पाल्यांवर योग्य ते नैतिक मूल्य रुजवण्यासोबतच तो काय करतो, त्याची संगत कशी आहे. याकडे लक्ष देणं ही पालकांची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. जर तो आड मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळीच रोखणेही पालकांचे कर्तव्य आहे.
– वैभव जाधव, ठाणेदार वणी पोलीस स्टेशन
दर वेळी ‘रोटी, कपडा, मकान’ या गरजांसाठी किंवा हलाखीच्या परिस्थितीमुळे एखादी व्यक्ती गुन्हेगार होते, असं नाही. ‘भाईगिरी’ची नको ती हौस, तंत्रज्ञानाचा नको तसा वापर, वाढती स्पर्धा, बंडखोर प्रवृत्ती, वाईट संगत अशी अनेक कारणे व्यक्ती गुन्हा करण्यामागे असतात. कारणे काही असली तरीही, परिणाम एकच असतो, आयुष्याचा सर्वनाश ! त्यामुळे ‘शायनिंग’च्या नादात केल्या जाणा-या ‘भाईगिरी’तून आपण काय साधणार? असा विचार तरुणांनी करणं आणि तो कृतीत उतरवणं गरजेचं आहे.