मंगळवार पासून शाळा क्र. 6 तील बगिचामध्ये भरणार भाजी बाजार
वणीतील किरकोळ भाजी मंडई चौथ्यांदा स्थलांतरित
जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर येथील किरकोळ भाजी बाजाराची जागा वारंवार बदलल्यामुळे हैराण झालेल्या भाजी विक्रेत्यांनी सोमवारी स्थानिक नगर परिषद प्रशासनविरुद्द संपाचे हत्यार उचलले. जेव्हा पर्यंत प्रशासन भाजी विक्रेत्यांना लॉकडाउन संपेपर्यंत एक स्थायी जागा देत नाही, तो पर्यंत आम्ही भाजी विकणार नाही. अशी भूमिका किरकोर भाजी विक्रेत्यांनी घेतली. अखेर प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्यानंतर उद्या मंगळवारपासून शाळा क्रमांक 6 च्या ग्राउंडवर (अमृत भवन जवळील बगिचा) येथे किरकोळ भाजी विक्रीची मंडई भरणार आहे. भाजी विक्रेत्यांना जत्रा मैदानात स्थलांतरीत होण्याचा आदेश दिल्यामुळे भाजी विक्रेते संतप्त झाले. सततच्या जागा बदलण्यामुळे केवळ भाजी विक्रेत्यांनाच नाही तर ग्राहकांनाही नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. परिणामी त्याचा व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे.
आज किरकोळ भाजी विक्रीची सततची जागा बदलवण्यावरून भाजी विक्रेते आक्रमक झाले होते. भाजी विक्रेत्यांची समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार बोदकुरवार यांनी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर, उप विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार शाम धनमने सोबत चर्चा करून भाजी विक्रेत्यांना नगर परिषद शाळा क्र. 6 च्या ग्राउंडवर (बगिच्याच्या ठिकाणी) किरकोळ भाजी बाजार भरण्यास मंजुरी दिली. भाजी विक्रेत्यांनीसुद्दा या जागेवर बाजार सुरू करण्यास आपली संमती दिली आहे. त्यामुळे उद्यापासून भाजी बाजार नवीन जागेवर सुरू होईल.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असता, अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. विक्रीसाठी येणारा भाजीपाला आणि त्याची खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यांची संख्या मोठी असल्यामुळे नगर परिषद समोर असलेली वणीतील ठोक भाजी मंडी वरोरा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात स्थलांतरित करण्यात आली. तर किरकोळ विक्रेत्यांना आंबेडकर चौक, साई मंदिर चौक, जत्रा चौक अशा विविध ठिकाणी जागा देण्यात आली.
सर्व चौकात भाजी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी व्हायची. तसेच सुरक्षा व दररोज रस्ता जामची परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दीमुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा बाजार बस स्थानकमध्ये परिसरात स्थलांतरित करण्यात आला. मात्र 8 दिवसानंतरच प्रवासी मजुरांना सोडण्यासाठी एस.टी. बसेसचे डेपोतून जाणे येणेचे कारण पुढे करून भाजी विक्रेत्यांना पाण्याची टाकीजवळील शासकीय मैदानात दुकाने लावण्याचा फर्मान सोडण्यात आले.
भाजी विक्रेत्यांनी शासकीय फर्मान अंगीकार करून शासकीय मैदानावर दुकाने सुरू केली. मात्र मागील एका आठवड्या पासून उन्हाचा तडाखा वाढल्याने तसेच मैदानावरील रेती उडून भाजी खराब होत असल्यामुळे भाजी विक्रेत्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नगर परिषद प्रशासनाकडून भाजी विक्रेत्यांना जत्रा मार्केट येथे बाजार सुरू करण्याची सूचना देण्यात आली. परंतु जत्रा बाजार परिसर हा शहराच्या दुसऱ्या टोकावर असल्यामुळे शहरातील ग्राहक भाजी खरेदी करण्यासाठी तेवढे दूर येणार नाही, याची जाणीव असल्यामुळे विक्रेत्यांनी नगर परिषदचे प्रस्ताव धुडकावून लावला.
सततच्या जागा बदलवल्यामुळे ग्राहकांची संख्या घटली – भाजी विक्रेते
शहरातील विविध चौक ते बस स्टँड, बस स्टँड ते शासकीय मैदान आणि आता शासकीय मैदान ते अन्यत्र असे भाजी बाजार वारंवार स्थलांतरित होत असल्यामुळे आम्हाला तर त्रास होतच आहे. शिवाय ग्राहकांनाही हेलपाटे सहन करावे लागत आहे. अशा जागा बदलवण्यामुळेच ग्राहकांची आवक कमी झाली. त्यामुळे नगर परिषदने शहराच्या मध्यभागी पर्यायी जागा उपलब्ध करून घ्यावेत. अशी आमची मागणी होती.– भाजी विक्रेते
अखेर भाजी विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना अमृत भवन जवळ शाळा क्र. 6 च्या खुल्या जागेवर दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.