जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुनवट येथील एका शेतक-याच्या घरी चोरी झाली होती. याची तक्रार 6 जाने. रोजी नोंदवण्यात आली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा गावातीलच असून त्याचे नाव गणपत मधुकर सूर (30) असे आहे. आरोपीकडून चोरी केलेल्या रक्कमेपैकी 17 हजार रुपये जप्त करण्यात आले.
पुनवट येथील शेतकरी अमोल गजानन पिदूरकर यांच्या आईने मध्यवर्ती बँकेतून पैसे काढून 19 हजार रुपये घराच्या कपाटात ठेवले होते. पैसे कपाटात ठेवून नेहमीप्रमाणे त्या घराला कुलुप न लावता दार ओढून शेतात गेल्या. दरम्यान संधी साधून अज्ञात चोरट्यानी घराचे दार उघडून प्रवेश केला व कपाटातील ठेवलेले 19 हजार रोख लंपास केले. याबाबत अमोल पिदूरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान सपोनि गजानन करेवाड यांना गोपनीय सूत्रांकडून चोरीच्या घटनेपूर्वी पुनवट येथीलच गणपत मधुकर सूर (30) हा इसम फिर्यादीच्या घरात गेल्याची माहिती मिळाली. माहितीवरून संशयित गणपत सूर यास पुनवट येथुन ताब्यात घेऊन शिरपूर ठाण्यात आणले. चोरी बाबत विचारपूस केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवितात आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेल्या रक्कमेतील 17 हजार रुपये हस्तगत केले.
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी: ठाणेदार
नागरिकांनी घरातील रोख रक्कम व मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवावी. तसेच बाहेरगावी जाताना कपाट व घराला कुलूप लावावे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास चोरीसारख्या घटनांवर आळा बसवणे शक्य आहे.
– गजानन करेवाड: सपोनि पो.स्टे. शिरपूर
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन करेवाड, अभीजीत कोषटवार, प्रमोद जुनुनकर, सुनिल दुबे, गजानन सावसाकडे यांनी केली. अवघ्या 24 तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या कार्यावाहीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
