चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

गेडाम ले आऊट मधील घटना, पोत, झुमके, पेंडन्टसह 25 हजारांवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कपाटात ठेवलेले दागिने व बचत गटाचे पैसे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गेडाम ले आऊट येथे ही घटना घडली. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने सुमारे 60 हजारांचा डल्ला मारला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार, फिर्यादी भाग्यश्री संदीप गेडाम (32) या वणीतील  छत्रपति नगर, गेडाम ले आऊट (जैन ले आऊट जवळ) येथे मोरे यांच्या घरी भाड्याने राहतात. दिनांक 5 सप्टेंबर रोजी त्यांनी सोन्याची पोत, गळ्यातील सोन्याचे मणी, पेंडन्ट, झुमके व बचत गटाची 25 हजारांची रक्कम घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवली होती. त्या लॉकरची चावी कपाटातील ड्रॉवरमध्ये तर कपाटाची चावी कपाटाच्या वरती ठेवायच्या. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी त्यांना पैशाची गरज भासली. त्यामुळे सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी कपाट उघडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लॉकर उघडल्यावर त्यांना धक्का बसला. लॉकर रिकामे होते. त्यात ठेवलेले सर्व दागिने व रोख रक्कम त्यांना लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी घरात याचा शोध घेतला. मात्र त्यांना दागिने व रक्कम आढळून आली नाही. कुणीतरी अज्ञात इसमाने घरफोडी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी त्यांच्या भावासह वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली.

अज्ञात चोरट्याने सोन्याचे मणी व पेंडन्ट किंमत अंदाजे 25 हजार, सोन्याची पोत व 3 ग्रॅमचे झुमके किंमत अंदाजे 10 हजार व नगदी 25 हजार असा सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दिनांक 5 ते 22 सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. पोलिसांनी भाग्यश्री यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 305(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.