ग्रामपंचायतचा मुरुम समजून टाकला स्वत:च्या घरासमोरील खड्ड्यात

मुरुम टाकण्यावरून वाद, दोन महिलांसह तिघांची तरुणाला फावड्याने जबर मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पावसाळा सुरु असल्याने रस्त्यावर पाण्याचे डबके साचत आहेत. मातीमुळे घरासमोर चिखल होत आहे. अनेक वार्ड, गावात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. खड्डे बुजवण्यासाठी एकाने मुरुम विकत आणला. मात्र शेजा-यांनी ग्रामपंचायतचा मुरुम समजून हा मुरुम उचलून आपल्या घरासमोर टाकला. यातून वाद होऊन एका तरुणाला तिघांनी फावड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे डोके फुटले तर मध्यस्थी करणा-या त्याच्या आईला देखील मारहाण करण्यात आली. वणी तालुक्यातील विरकुंड येथे ही घटना घडली. 

तक्रारीनुसार, फिर्यादी ऋषीकेश देविदास सातपुते (25) हा विरकुंड येथील रहिवासी असून तो शेती करतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने त्याच्या घरासमोर पावसाचे पाणी साचत होते तसेच घरासमोर चिखल व्हायचे. त्यामुळे त्याने एक ट्रॅक्टर मुरुम घरासमोर टाकण्यासाठी विकत आणला. हा मुरुम त्याने घरासमोर टाकला. गुरुवारी दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास तो घरासमोर उभा होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान त्याला त्यांच्या घराशेजारी राहणारे आरोपी मंगला भाऊराव आत्राम (35), संगिता देवराव पेटकर (36), पवन देवराव पेटकर (22) यांनी हा मुरुम ग्रामपंचायतचा समजून उचलून आपल्या घरासमोर टाकण्यास सुरुवात केली. ऋषीकेशने मुरुम त्याने विकत आणल्याचे सांगून विरोध केला, परंतु आरोपींनी “हा ग्रामपंचायतचा मुरुम आहे, तुला काय समस्या आहे?” असे म्हणत वाद घालण्यास  सुरूवात केली.

मुरुम उचलण्यावरून सुरु झालेला वाद शिविगाळ करण्या पर्यंत पोहोचला. एका महिलेने ऋषीकेशच्या डोक्यात फावडे हाणले. यात त्याचे डोके फुटले. तर पवन याने फावड्याचा दांडा पाठीवर मारला. दरम्यान ऋषीकेशची आई मध्यस्थी करण्यास आली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. अखेर घराशेजा-यांनी ही मारामारी सोडवली. ऋषीकेशने तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठत तिन्ही आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी मंगला भाऊराव आत्राम (35), संगिता देवराव पेटकर (36), पवन देवराव पेटकर (22) यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.