जिनिंगच्या आवारातून लोखंडी साहित्याची चोरी

चोरट्यांना धास्तीने सुरक्षा रक्षकच गेले पळून..... पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जितेंद्र कोठारी, वणी  :  झरी तालुक्यातील सुर्दापूर येथील जिनिंगच्या आवारात ठेवलेले जुने लोखंडी अंगल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.  जिनिंग मालकाच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे जिनिंगमध्ये मशिनरी व साहित्याची सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले दोन्ही सुरक्षा रक्षक चोरट्यांना पाहून पळून गेले. त्यामुळे चोरीच्या घटनेत सुरक्षा रक्षकांचाच हात तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

तक्रारदार प्रीतम प्रकाश कोचर (44) रा. सिव्हील लाईन चंद्रपूर यांनी पाटण पोलिसात दिलेल्या फिर्यादनुसार त्यांनी 2020 मध्ये सुर्दापूर येथील जयराम अग्रो जिनिंग भारतीय स्टेट बँकेकडून लिलावात खरेदी केली. यावर्षी त्यांनी जिनिंगचा ताबा घेतला असून जिनिंगमध्ये मशिनरी दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यासाठी जिनिंग मधील जुने लोखंडी अंगल व मशिनरी काढून मोकळ्या आवारात ठेवली होती. जिनिंगमधील साहित्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी भुमन्ना पोचन्ना मग्गीडवार (61) व संजय पोचन्ना मग्गीडवार (50) रा. दिग्रस, ता. झरी या दोघांना सिक्युरीटी गार्ड म्हणून ठेवले होते.

सोमवार 9 ऑक्टो. रोजी पहाटे 3 वाजता दरम्यान काही चोरट्यांनी जिनिंगमध्ये प्रवेश करून आवारात ठेवलेले लोखंडी अंगल चोरून नेली. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी जिनिंगमध्ये प्रवेश केला तेव्हा दोन्ही सुरक्षा रक्षक जिनिंगमध्ये कर्तव्यावर होते. मात्र चोरट्यांना पाहून दोघं तिथून पळून गेले. जिनिंगमध्ये चोरी झाल्याची माहितीवरून जिनिंग मालक लगेच सुर्दापूर येथे पोहचले. त्यांनी आवारात ठेवलेले लोखंडी साहित्याची तपासणी केली असता चोरट्यांनी चापट आकाराचे जिनिंगचे 13 जुने लोखंडी अंगल किमत 13 हजार, गोल आकाराचे 4 अंगल किमत 2 हजार रुपये तसेच लहान आकाराचे 20 लोखंडी तुकडे किमत 2 हजार असे एकूण 17 हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरून नेल्याचे दिसून पडले. तक्रारदार यांनी चोरीच्या घटनेबाबत पाटण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनात कॉन्स्टेबल अमित पोयाम करीत आहे.

Comments are closed.