बहुगुणी डेस्क, वणी: मळणी यंत्राने काढलेल्या सोयाबीन येथील 3 पोते सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले. मात्र वणीत एका धान्य व्यापा-याला सोयाबीन विकताना चोरट्यांचे बिंग फुटले. बिंग फुटताच चोरट्यांनी धूम ठोकली. मात्र शेतक-याने एकाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. शेतक-याच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर माधवराव नागपुरे (57) हे मोहुर्ली ता. वणी येथील रहिवासी आहे. ते शेतकरी असून त्यांची मोहुर्ली शिवारात शेती आहे. सोमवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी त्यांनी मळणी यंत्राद्वारे सुमारे 22 ते 24 पोते सोयाबीन काढले व ते वाळवण्यासाठी शेतातच ठेवले होते. गुरुवारी दिनांक 26 रोजी सकाळच्या सुमारास ते शेतात गेले असता त्यांना त्यातील 3 ते 4 पोते सोयाबीन गायब झाल्याचे आढळले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना रस्त्याने काही सोयाबीनचे दाणे पडलेले दिसले. त्यावरून त्यांना चोरीचा संशय आला.
त्यानंतर त्यांनी लगेच वणीतील एका धान्य व्यापा-याकडे धाव घेतली. सकाळी 8 वाजताच्या सुमारास ते धान्याच्या दुकानात पोहोचले. सकाळी दुकान बंद होते. मात्र त्यांना दुकानासमोर 3 जण आढळून आले. त्यांच्याजवळ दोन कट्टे सोयाबीन होते. किशोर यांनी सोयाबीन कुठून आणले याबाबत त्यांना विचारणा केली असता या तिघांनी घाबरून तिथून पळ काढला. यातील 1 जण कोरंबी मारेगाव, 2 मोहुर्ली येथील होता.
हे तिघेही किशोर यांच्या परिचयाचे होते. कोरंबी मारेगाव येथील एकाला पकडून किशोर यांनी वणी पोलीस स्टेशनला आणले. तसेच याबाबत तक्रार दिली. किशोर नागपुरे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.