विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावाहून दर्शनासाठी आलेल्या एक भाविक कीर्तनात बसल्या. कीर्तन संपल्यानंतर महाराजाच्या पाया पडण्यासाठी स्टेजवर गेल्या. मात्र पाया पडताना एका चोरट्याने संधी साधत त्यांच्या गळ्यातील गोफवर हात साफ केला. सदर गोफ हा 12 ग्रॅमचा आहे. तालुक्यातील भांदेवाडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे आता धार्मिक स्थळी देखील डाव साधत असल्याने या घटनेमुळे भाविकांची चिंता वाढू शकते.
फिर्यादी शारदा गुलाबराव मेहरपुरे (55) या चिमूर येथील रहिवासी आहे. त्या रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी भांदेवाडा येथील मंदिरात कुटुंबीयांसह दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या शेजारीच भोयर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. दर्शन घेतल्यानंतर त्या कीर्तन ऐकण्यासाठी बसल्या.
दुपारी 1 वाजताच्या सुमारास महाराजांचे कीर्तन संपले. कीर्तन संपल्याने शारदा या महाराजांचे दर्शन घेण्याकरीता महाराजांजवळ गेल्या. त्या पाया लागण्यासाठी वाकल्या. दरम्यान त्यांना कुणीतरी गळ्यातील गोफ ओढल्याचे जाणवले. त्यांनी गळ्यात हात लावून बघितले असता त्यांना गळ्यातील गोफ चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरट्याने त्यांच्या 12 ग्रॅम वजनाच्या गोफवर (किंमत अंदाजे 69,600 रुपये) हात साफ केला होता.
त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र त्यांना गोफ आढळला नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधा बिएनएसच्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास एपीआय अपसुंदे करीत आहे.
Comments are closed.