बहुगुणी डेस्क, वणी: सध्या कापसाला भाव नसल्याने अनेक शेतक-यांनी कापूस बंड्यात साठवून ठेवला आहे. मात्र अशा कापसावर आता चोरट्यांनी नजर गेली आहे. चोरट्यांनी तब्बल 25 क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना राजूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की प्रवीण नारायण महाकुलकार (41) हे झरपट येथील रहिवासी आहे. ते शेतमजुरीचे काम करतात. गेल्या वर्षी सन 2022 मध्ये त्यांनी राजूर कॉलरी येथील रहिवासी असलेले अशोक दुर्गमवार( 60) यांचे राजुर कॉलरी शिवारात असलेले 17 एकर शेत ठेक्याने घेतले. त्यात त्यांनी कापसाचे पिक लावलेले. यंदा त्यांना आतपर्यंत 50 क्विंटल कापूस झाला आहे. मात्र कापसाला कमी भाव असल्याने कापूस विकण्या ऐवजी त्यांनी साठवण्याचे ठरवले.
एक महिन्यापूर्वी मित्र सुरेश मोखतार सिंह (65) रा. राजुर कॉलरी यांच्या मालकीच्या कळमणा शेत शिवारात ताराचे कंम्पाऊंन्ड असलेल्या शेतातील एका बंड्यात त्यांनी 50 क्विंटल कापूस ठेवला होता. प्रवीण हे नेहमी कापसाची पाहणी करण्यासाठी बंड्यावर जात असे. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास सदर बंड्यामध्ये ठेवलेला कापूस जावुन पाहीला असता तेव्हा कापूस सुरक्षित दिसून आला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 5 डिसेंबर ला सकाळी 9 ते 10 वाजता च्या सुमारास प्रवीणला त्यांच्या मित्राचा कॉल आला की शेतात असलेल्या बंड्याला लावलेले कुलुप कुणीतरी तोडले असून आत असलेला कापूस चोरीला गेला आहे. माहिती मिळताच प्रविण महाकुलकार हे लगेच बंड्यावर गेले असता त्यांना 50 क्विंटल पैकी अंदाजे 25 क्विंटल कापुस चोरीला गेल्याचे आढळले.
प्रवीण यांनी तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या चोरीत त्यांचा 25 क्विटल कापूस चोरीला गेला असून याची किंमत अंदाजे 1 लाख 63 हजार रुपयांचे आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 461, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.