वणी-कोरपना रस्त्याच्या चौपदरीकरणासह विविध मागण्यांसाठी निवेदन

बससेवा नसल्याने व नदीवर पूल नसल्याने नागरिक त्रस्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी-कोरपना राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल बांधण्यात यावा, गडचांदुर-शिंदोला- वणी बस सेवा सुरू करण्यात यावी आदी मागण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन दिले.

वणी ते कोरपना हा यवतमाळ- चंद्रपूर जिल्हयाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग वणी येथून वणी-वरोरा राष्ट्रीय महामार्ग व कोरपना येथून राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच या महामार्गावरून सिमेंट, कोळसा, गिटी खदान व अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्या दृष्टीने हा मार्ग कोरपना पासून ते नागपूरपर्यंत थेट सुलभ होण्यासाठी या मार्गाचे त्वरित चौपदरीकरण करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.

पैनगंगा नदी तेजापूर-गांधीनगर या दोन गावांना व जिल्ह्यांना वेगळी करते. नदी घाटावरून परिसरातील ग्रामस्थांना नावेच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करत जावे लागते आहे. या घाटावर पूल झाल्यास कोरपना पासून कायर, मोहदा पर्यंतची सर्वसामान्य रहदारी व औद्योगिक वाहतूक कमी अंतरात होईल. वाहतूकदारांना करावी लागणारी उलट फेऱ्याने प्रवासाची अडचण दूर होऊन कमी अंतरात दोन्ही कडील गावे एकमेकाला जोडली जाईल.

तसेच गडचांदुर-शिंदोला-वणी मार्गावर सद्यस्थितीत एकही बस फेरी धावत नाही. परिणामी या मार्गावरील ग्रामस्थांना जाण्या-येण्यास मोठी गैरसोय होते आहे. ही बस फेरी सुरू झाल्यास या भागातील नागरिकांची गैरसोय टाळली जाईल. या सर्व मागण्यांचा केंद्र व राज्य शासन दरबारी पाठपुरावा करून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन आमदार बोदकुरवार यांनी याप्रसंगी दिले.

हे देखील वाचा:

मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

Comments are closed.