विद्युत तारा व विद्युत खांब चोरणारे अद्यापही मोकाट

कधी होणार चोरट्यांवर व भंगार विक्रेत्यांवर कारवाई? युवासेनेचा सवाल

विवेक तोटेवार, वणी: विद्युत तार चोरी करताना शंकर कुमरे या युवकाचा मृत्यू झाला होता. विद्युत तार चोरी करताना आतापर्यंत परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र याकडे अद्यापही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. चोरीचा मुद्देमाल हा भंगार विक्रेत्यांच्या दुकानात विकल्या जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चोरटे व भंगार व्यावसायिकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी युवासेनेने उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.

गेल्या एक वर्षापासून वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या विद्युत तारा व लोखंडी खांब कापून चोरण्याचा सपाटा सुरू आहे. यात लाखों रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याबाबत विद्युत विभाग मार्फत वणी, शिरपूर आणि मुकुटबन पोलिसात तक्रार दाखल असली तरी यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने चोरटे अद्यापही मोकाट फिरत आहे.

दिनांक 17 नोव्हेंबर 2017 रोजी मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परसोडा परिसरात विद्युत तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना शंकर सुपारी कुमरे या युवकाचा मृत्यू झाला. या चोरीच्या प्रकरणातील चोरटे निष्पन्न झाले असूनही ते मोकाट फिरत आहे. इतका गंभीर प्रकार घडत असतानाही पोलीस प्रशासन अद्यापही यावर कठोर कारवाई करीत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

आतापर्यंत तीन तरुणांचा मृत्यू
गेल्या काही काळात चारा चोरण्याच्या प्रयत्नात 3 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. परिसरात विद्युत तारा व खांब कापून चोरणा-यांची टोळी सक्रीय आहे. ही टोळी चोरीचा माल भंगारच्या दुकानात विकत आहे. त्यामुळे चोरट्यांचे तसेच भंगार व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे. तर विद्युत तारा कापल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वणी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्य, स्पींकलर, झटका मशीन असे शेतीला लागणारे साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र याबाबतची तक्रार देण्यासाठी शेतकरी वणी पोलीस ठाण्यात गेले असता फिर्यादीला लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने चोरट्यांना रान मोकळे असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जर येत्या आठ दिवसात चोरट्यांवर कारवाई न झाल्यास यवतमाळ येथे तीव्र आंदोलन पुकारले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख, चेतन उलमाले, राहुल कोलते, तुळशीराम काकडे, प्रफुल बोर्डे, प्रवीण मांडवकर, निखिल गट्टेवार, अभिषेक बनकर वजीर खान उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.