पोलीस स्टेशन आवारात शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
गोहत्या प्रकरणी आरोपींना पाठिशी घालण्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: गोहत्या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सर्व आरोपींवर सौम्य कलम लावण्यात आले. त्यामुळेच सर्व आरोपींची बेल झाली. हा आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रकार असा आरोप करीत आरोपींवर कठोर वाढीव कलमे लावून त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली. जर आरोपींवर योग्य ती कारवाई न झाल्यास वणीत निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आवारात विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत धरणे आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाईचे वचन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
शहरातील जत्रा मैदान रोडवरील कत्तलखान्याजवळ शेकडो मृत गायीचे शीर आढळले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी कार्यवाही करीत 8 संशयीतांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कत्तलखान्याजवळून व एका कार्यक्रम स्थळावरून मांसाचे सॅम्पल जप्त केले. ताब्यातील आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आरोपींना तात्काळ बेल झाली. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. सौम्य कलमे लावल्यानेच आरोपींना बेल झाली. आरोपीवर वाढीव कलमे लावून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 13 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हिंदूत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे त्यांनी ठिय्या देत धरणे आंदोलन केले.
हा दंगली घडवण्याचा प्रकार – संजीवरेड्डी बोदकुरवार
गायीला राजमातेचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या राजमातेचे कापलेले शीर भर रस्त्यात फेकले जाते. हा प्रकार दंगली घडवण्याचा प्रकार आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही पोलीस प्रशासनाने आरोपींवर सौम्य कलमे लावली. पोलिसांनी आरोपीचा पीसीआर मागितला असता शेकडो गायींची कत्तल करणारा मास्टरमाईंड सापडला असता. पोलिसांनी रिपोर्ट येण्याच्या आधीच जप्त केलेले सॅम्पल नष्ट केले. या प्रकरणी पोलीस प्रशासन आरोपींना पाठिशी घालीत असून आरोपींवर वाढीव कलमे न लावल्यास वणीत निषेध मोर्चा काढण्यात येईल.
ठिय्या आंदोलनाच्या वेळी माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, रवि बेलूरकर, राजू तुराणकर, ललित लांजेवार, विनोद मोहितकर, अजिंक्य शेंडे, संजय पिंपळशेंडे, कुणाल चोरडिया इत्यादींनी ठाणेदार व एसडीपीओ यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी वकिलांची मदत घेतली जात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती तारेंद्र बोर्डे यांनी दिली. आंदोलनात श्री राम सेना, बजरंग दल, श्रीराम नवमी उत्सव समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
Comments are closed.