वणी तालुक्यातील हजारों शेतकरी चना विक्रीच्या प्रतीक्षेत

खरेदीवरून खरेदी विक्री संघ व बाजार समितीचे एकामेकावर आरोप

0

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजने अंतर्गत नाफेडतर्फे तूर व चना खरेदी सुरु करण्यात आली असून स्थानिक खरेदी विक्री संस्थाच्या गलथान कारभारामुळे सोयाबीन व तूर पाठोपाठ चना खरेदीचाही पुरता बोजवारा उडाला आहे. तूर व चना खरेदीची अखेरची तारीख 31 मे 2020 असून वणी तालुक्यात आता पर्यंत नोंदणी केलेले शेतकऱ्यांपैकी फक्त 10 टक्का शेतकऱ्याचे हरभरा खरेदी करण्यात आले आहे.

राज्यात एक मार्च पासून ‘नाफेड’ च्या माध्यमातून 4400 रु. प्रती क्विंटल हमीभावाने चना खरेदी सुरु करण्यात आली. हमीभावाने चना विक्री करिता वणी तालुक्यातील तब्बल 1239 शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संस्थाकडे ओंनलाईन नोंदणीही केली. परंतु सहकारी खरेदी विक्री संघाच्या गलथान कारभारमुळे 6 मे 2020 पर्यंत शासकीय खरेदी सुरु करण्यात आली नाही.

मुकुटबनमध्ये खरेदी सुरू मग वणीत का नाही?
वणी विभागातीलच मुकुटबन बाजार समितीने 16 एप्रिल पासून खरेदी सुरु करून आता पर्यंत 586 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे 11 हजार 88 क्विंटल माल खरेदी केले. तर येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती अंतर्गत वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 मे पर्यंत फक्त 147 शेतकऱ्यांचे 2871 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आले आहे.

चना खरेदीवरून एकमेकांवर आरोप….
शासनाने नाफेड मार्फत तूर व चना खरेदीसाठी 31 मे 2020 अखेरची तारीख ठरविली असताना वणी तालुक्यातील 90 टक्का शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत येथील खरेदी विक्री संघाचे प्रबंधक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी हरभरा खरेदी उशीर सुरु होण्यामागे बाजार समितीने खरेदीसाठी आवश्यक साहित्य व गोडावून उपलब्ध करून न दिल्याचा कारण सांगितले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी खरेदी विक्री संघाचे आरोप फेटाळून हरभरा खरेदीसाठी बाजार समितीने 17 मार्च रोजी समिती यार्ड, गोडावून व इतर साहित्य खरेदी विक्री संस्थेच्या ताब्यात दिल्याचे पुराव्यानिशी सांगितले.

शासनाकडून शेतकऱ्याचे शेतमाल हमीभावाने खरेदी करताना लादलेले जाचक अटी व निकष शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. एका सातबारावर कमाल 25 क्विंटल कापूस, तूर, चना हमीभावाने विकता येईल अशी जाचक अटी ठेवली आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला उर्वरित शेतमाल कमी भावाने खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत आहे. सद्य परिस्तिथीत नाफेड तर्फे हरभरा 4875 रू. प्रती क्विंटल खरेदी करण्यात येत आहे. तर खाजगी व्यापारी 3850 रु. प्रती क्विंटलच्या दराने चना खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर क्विंटल मागे 1025 रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

प्रातिनिधिक फोटो

बाजार समितीमुळे खरेदीस उशीर – देशपांडे
1 मार्च पासून हमीभावाने चना खरेदी करावयाची होती, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड, गोडावून व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन न दिल्यामुळे तसेच लॉकडाउनच्या अनुषंगानेचना गर्दी होऊ नये म्हणून खरेदी उशिरा सुरू करण्यात आली :देशपांडे, सचिव, सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, वणी

खरेदी विक्री समितीचे आरोप बिनबुडाचे – अशोक झाडे
नाफेडच्या तूर खरेदी हंगाम 2019-20 करीता गोडावून व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे बाबत खरेदी विक्री समितीचे पत्र दि. 13/03/2020 व मा. आमदार वणी विधानसभा यांचे पत्र दि. 17/03/2020 च्या अनुषंगाने बाजार समितीचे पत्र जा. क्र. 370/2019-20 दि. 17/03/2020 अनव्ये नाफेड तूर व चना खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मॉइश्चर मीटर, चाळणी, गोडावून व मार्केट यार्ड उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हितकरिता ताबडतोब खरेदी सुरू करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे खरेदी विक्री समिती सचिवांचे आरोप बिनबुडाचे आहे. खरेदी विक्री समिती शेतकऱ्यांसमोर स्वतःचे अपयश लपविण्यासाठी बाजार समितीला टार्गेट करीत आहे. :अशोक झाडे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

25 क्विंटल खरेदीची अट शिथिल – अमोल राजगुरू
गेल्या वर्षी खरेदी केलेले तूर व चना साठवून असल्यामुळे वखार महामंडळाच्या वणी व मारेगावच्या गोडाऊनमध्ये नवीन माल ठेवण्याची जागा नाही. आंतरजिल्हा वाहतुकीची परवानगी आता मिळाली आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले शेतमाल बाजार समिती आवारात खुल्यामध्ये ठेवता येत नाही. जो पर्यंत खरेदी केलेले माल शासकीय वेअरहाऊसमध्ये जमा करून त्याची पावती मिळत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे मिळत नाही. या सर्व समस्येमुळे काही दिवस खरेदी बंद करण्यात आली होती. आता शासनाने एका सातबारावर 25 क्विंटल कमाल खरेदीची अट शिथिल करून 25 क्विंटल दर दिवशीची सूट दिली आहे. खरेदीची शेवटची तारीख 31 मे पासून वाढवून 15 जून करण्यात आली आहे. :अमोल राजगुरु, विभागीय व्यवस्थापक
विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग समिती

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.