नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी परिसरात वाघाचे दर्शन नित्याचेच झाले असताना शनिवारी खैरगाव बीट हद्दीत चक्क वाघाने हल्ला चढवून एक गाय फस्त करून गो-हाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वनविभागाच्या खैरगाव बिटमधील कक्ष क्र.69 मध्ये घडली.
मारेगाव वनविभागाच्या हद्दीत येणारा बोटोनी, सराठी, खैरगाव, वसंतनगर हे जगलंव्याप्त क्षेत्र आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच सराठी मार्गावर खैरगाव फाट्याजवळ अनेकांना येता-जाता वाघाचे दर्शन घडले होते. आज शंकर मारोती मेश्राम या शेतकऱ्याची गुरे जंगलालगत चरत असताना वनविभागाच्या खैरगाव बिटमधील कक्ष क्र.69 च्या हद्दीत वाघाने चरत असलेल्या एका गाईवर हल्ला करून ठार केले. तर एका गोऱ्याला गंभीर जखमी केले आहे.
या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत झाली आहे. या परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून जनजागृतीचे काम सुरू आहे. वनविभागाने लगतच्या गावात दवंडी दिली. या परिसरात पशुपालकांनी आपली जनावरे या परिसरात सध्या चरण्यासाठी सोडू नये असा सतर्कतेचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी दिला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)