कोलेरा येथील वेकोलि सबस्टेशन जवळ नरभक्षी वाघ जेरबंद

घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी, जेरबंद वाघाची गोरेवाडा येथे रवानगी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्यानंतर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर 10 दिवसानंतर वाघाला कोलेरा परिसरातील जंगलात पकडण्यात वनविभागाच्या टीमला यश आले आहे. आज दुपारी नरभक्षी वाघाला नागपूर येथील गोरेवाडा येथे रवाना करण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यात आल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

उप वन संरक्षक पांढरकवडा किरण जगताप यांच्या नेतृत्वात विविध टीम कोलेरा परिसरात नरभक्षी वाघाचा शोध सुरू होता. कोलेरा, कोलार पिंपरी व पूनवट गावालगत असलेल्या जंगलात 20 पेक्षा जास्त ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यासाठी 2 मोठे पिंजरे आणण्यात आले. वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी ट्रंक्युलायझर गनसह रेस्क्यू पथकसुद्धा तळ ठोकून होते. मात्र 10 दिवसांपासून वाघ हुलकावणी देत होता. आज बुधवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गावातील काही लोकांना कोलेरा येथील जंगलात वाघ असल्याचे आढळून आले. गावक-यांनी याची तातडीने वनविभागाला माहिती दिली. 

वाघाची माहिती मिळताच जंगलात असलेल्या पथकाला बोलावण्यात आले. कोलेरा येथे वनविभागाच्या दोन जीप आल्या व रेस्क्यू पथक दाखल झाले. लोकांच्या माहितीवरून शोध घेतला असता वाघ कोलार पिंपरीजवळील वेकोलि सबस्टेशनलगतच्या शिवारात असल्याचे आढळून आले. सकाळी 8 वाजताच्या सुमारास वाघाला ट्रँक्युलायझर गनने शुट करून बेशुद्ध करण्यात आले. वाघ बेशुद्ध झाल्यानंतर वाघाला पिंज-यात जेरबंद करण्यात आले. 

45

वाघ बघण्यास एकच गर्दी
वाघाला जेरबंद केल्याची माहिती मिळताच परिसरातील गावातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मात्र मात्र रेस्क्यू पथकाने नेट लावून वाघाला गाडीत असलेल्या पिंज-यात ठेवले. त्यामुळे वाघाला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांची निराशा झाली. दरम्यान काही लोक शंका देखील उपस्थित करीत होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास वाघाला घेऊन वनविभागाचे पथक घटनास्थळावरून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. या नरभक्षी वाघाला गोरेवाडा येथे नेण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.  

संपूर्ण वणी उपविभागातच वाघाची दहशत
वाघाने कोलेरा येथील एकाला जखमी केले होते तर एकाचा फडशा पाडला होता. त्याआधी भुरकी येथे वाघाने एका तरुणाचा जीव घेतला होता. काही दिवसांआधी मुकुटबन जवळील खडकी गावाजवळील एका धाब्यावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. शिवाय मारेगाव तालुक्यातील बोटोणी, केगाव, खेकडवाई, गोंडबुरांडा या भागात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. दोन दिवसांआधी मार्डी जवळील एका बेड्याजवळील शेतात वाघ पाणी पिण्यासाठी आला होता. 

Comments are closed.