तेली फैल येथील महिलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

कायद्याचे उल्लंघण झाल्यास कार्यवाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण.

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील तेलीफैल येथील लोढा हॉस्पिटल येथे होणा-या डेडिकेटेड हॉस्पिटलच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचा आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 12 महिला 23 सप्टेंबर पासून उपोषणाला बसल्या आहेत. वस्तीमध्ये असल्याने परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्तीत कोविड हॉस्पिटल होऊ देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे. तर स्थानिकांचा विरोध गैरसमजातून असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार तेली फैल येथील लोढा हॉस्पिटल येथे डे़डिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार झाले आहे. शनिवारी दिनांक 26 सप्टेंबर पासून तिथे परिसरातील कोविड रुग्णांवर उपचार केला जाणार. मात्र स्थानिकांनी याला विरोध दर्शवत साखळी उपोषण सुरु केले आहे. तेली फैलातीलच सदाशिव घाटोळे यांच्या ब्लॉकमध्ये 12 महिला कालपासून उपोषणाला बसल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

काय आहे स्थानिकांचा आरोप?
तेली फैल कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. त्यातून तेली फैल नुकताच सावरत आहे अशा वेळी परिसरात कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यास स्थानिकांना कोरोना होण्याचा धोका आहे. हॉस्पिटलमधले रुग्ण कोरोना पसरवू शकतात. असा त्यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी डॉ. महेंद्र लोढा यांची भेट घेऊन कोविड हॉस्पिटलचे काम थांबवले होते. मात्र प्रशासनाने सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतर हॉस्पिटलचे उर्वरीत काम पूर्ण करण्यात आले असून 26 पासून तिथे उपचार सुरु होणार आहे.

तीन फुटांच्या अधिक अंतर असल्यास संसर्ग नाही – डॉ. शरद जावळे
कोरोनाचा संसर्ग केवळ पॉजिटिव्ह व्यक्तीपासून 3 फुटांच्या आत असल्यास होऊ शकतो. 3 फुटांच्या वर अंतरावर असणा-यांना कोरोनाचा धोका नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेला विरोध विनाकारण आणि गैरसमजातून आहे. डेडिकेटेड हॉस्लिटल हे नागरिकांच्या सोयीसाठीच आहे. सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया पूर्ण करून हॉस्पिटल होत आहे. या प्रकरणी कुणी कायद्याचे उल्लंघण करीत असेल, तर प्रशासन आपले कर्तव्य पार पाडेल.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी वणी

दर्शना जुमडे, रंजना टोनपे, बेबीताई लोहकरे, रंजना पडोळे, वर्षा पडोळे, लता निमकर, वैशाली गायधने, प्रमिला झगझाप, वैशाली घाटोळे, मंदा घाटोळे, मनिषा घाटोळे, स्वाती गिरपुंजे या स्थानिक महिला उपोषणाला बसल्या आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.