ओमायक्रॉन येताच लसीकरणाला आला वेग

लसीकरणात वणी तालुका जिल्ह्यात अव्वल, मारेगाव, झरी मागे

जितेंद्र कोठारी, वणी: लसीकरणामध्ये वणी तालुका हा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. मात्र वणी उपविभागातील झरी आणि मारेगाव हे दोन तालुके अद्यापही मागेच आहे. वणी येथे 86.21 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून मारेगाव तालुक्यात 77.20 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर झरी तालुक्यातील 67.68 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. विशेष म्हणजे लसीकरण मोहीम थंडावली असताना ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएन्टचे सावट येताच लसीकरणाचा वेग आणखी वाढला आहे ही एक आशादायी बाब आहे.

वणी तालुक्यातील लोकसंख्या ही 2,17,677 इतकी आहे. यातील 2,12,869 लोकांचे लसीकरण झाले आहे. यात शहरी भागातील 43,100 लोकांनी वॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे तर 22,395 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण भागात 94,787 लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 52, 587 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. मारेगाव तालुक्यात 70863 लोकांचे लसीकरण झाले आहे. यातील 77.20 टक्के लोकांनी पहिला डोस तर 41.36 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. झरी तालुक्यातील 63357 लोकांचे लसीकरण झाले असून यातील 67.68 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणा-यांची संख्या अवघी 32.65 टक्के इतकी आहे.

तुडवडा असताना गर्दी, लस असताना फिरवली पाठ
वणी उपविभागात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा लोकांनी लसीकरणासाठी एकच गर्दी केली होती. वणीतील ग्रामीण रुग्णालयात त्यावेळी लसीसाठी जत्रा भरली होती. मात्र कोरोनाची जसजसी दुसरी लाट कमी झाली तसतसा लोकांना उत्साह देखील कमी झाला. आधी लसीकरणाबाबत अनेक गैरसमज होते. मात्र आता जनजागृती आणि लोकांना लसीचे महत्त्व पटल्याने लोक आता स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग नंतर आणखी वाढला. त्यातच ओमायक्रॉनचे सावट दिसताच नागरिकांचे पाऊलं आता लसीकरणासाठी वळत असताना दिसत आहे.

वणीत ग्रामीण रुग्णालय व कंल्याण मंडपम येथे लसीकरण सुरू
लसीकरणासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन परिश्रम घेत आहे. वणीतील ग्रामीण रुग्णालय व आंबेडकर चौक येथील कल्याण मंडपम येथे कधीही जाऊन लस घेता येऊ शकते. शिवाय ज्यांना सामुहिकरित्या लसीकरण करायचे आहे त्यांना महसूल विभागाला संपर्क साधून त्यांना त्यांच्या गावात किंवा वार्डात विशेष लसीकरण शिबिर घेता येऊ शकते. त्यामुळे याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल डोस झाला असेल तर दुसरा डोस अवश्य घ्या : विवेक पांडे
तालुक्यात सर्वांनी लस घ्यावी म्हणजेच 100 टक्के लसीकरण हे आमचे मिशन आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यास त्याचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे ज्यांचा कुणाचा एक डोस झाला असेल त्यांनी आवर्जून दुसरा डोस घ्यावा. जर काही लोकांचा गृप असेल किंवा ज्यांना गावात, वार्डात किंवा ठरलेल्या ठिकाणी सामुहिक लसीकरण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा. तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांचे दोन्ही डोस झाले नसल्यास त्यांचे देखील सामुहिकरित्या लसीकरण करता येऊ शकते. लसीकरणाबाबत माहितीसाठी तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा.
– विवेक पांडे, तहसीलदार वणी

वणी तालुक्यात तसेच उपविभागात पहिला डोस अधिकाधिक लोकांनी घेतला आहे. मात्र दुसरा डोस घेण्यात अद्यापही नागरिक मागे आहे. तसेच मारेगाव आणि झरी तालुक्यात पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस घेणा-यांचे प्रमाण हे तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. त्याबाबत अधिकारी, प्रशासन यांनी पुढाकार घेणे गरजेचे असून जनजागृतीसह आता नागरिकांनीही लस घेण्यास पुढे येणे गरजेचे आहे, तेव्हाच 100 टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण होऊ शकते. 

हे देखील वाचा:

मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत

 

Comments are closed.